गणेशोत्सव ‘सात्त्विक’ करा !

गणेशोत्सव विशेष…

प्रत्येक मंगलप्रसंगी प्रथम पूजन होते ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे ! ‘मंगलमूर्ती बाप्पाचे आशीर्वाद पाठीशी असले की, सर्व संकटे दूर होणार’, याची आपल्याला निश्चिती होते. त्या बुद्धीदात्या, विद्यापतीला वंदन करूनच अध्ययनाचा आरंभ होतो. असे असतांना सध्या मात्र अनेक विकृतींचा गणेशोत्सवात शिरकाव झाल्याने त्याचे रूप पालटले आहे. देशातील समस्यांची स्थिती बघता, हा उत्सव चालू झाला, त्या वेळची उद्दिष्टे आजही उपयुक्त आहेत. त्यामुळे हा उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरा केला, तर त्याचा अधिकाधिक लाभ होईल.

बाजारात अनेक रूपांतील गणेशमूर्ती असतात. वाहन चालवतांना गणपति, पोलिसाच्या वेशातील, चित्रपटातील एखाद्या नायकाच्या रूपातील, अशा विविध रूपांतील मूर्तींमुळे लोकांच्या मनातील त्या देवतेविषयीच्या श्रद्धा आणि भाव यांवर परिणाम होतो. त्या देवतेचे विडंबन होऊन अपमान झाल्याने पाप लागते ते वेगळेच ! श्री गणेशाची कृपा व्हायला हवी असेल, तर मूर्ती अथर्वशीर्षात वर्णन केल्याप्रमाणे पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची, नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. पाने, केळीचे खांब अशा सात्त्विक आणि नैसर्गिक मखरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना पाटावर करावी. आरती म्हणतांना आवाजात पुष्कळ चढ-उतार न ठेवता, एका लयीत, अर्थ समजून घेऊन, आर्त भावाने म्हणावी. सात्त्विक भक्तीगीते लावावीत. भजने, संकटनाशनस्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, धर्म आणि राष्ट्र जागृती यांचे कार्यक्रम आयोजित करावेत, जेणेकरून पुढील पिढीला योग्य दिशा मिळेल. ‘श्री गणेश खरोखरच समोर आहेत’, असा भाव सतत ठेवायचा प्रयत्न करावा.

उत्तरपूजेनंतर मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करावे. विसर्जनाला जातांना गणपतीसमवेत दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. वहात्या पाण्यामुळे पवित्रके सर्वदूर पोचतात आणि अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. वातावरणही सात्त्विक होण्यास साहाय्य होते. प्रदूषणाचे कारण पुढे करत जे लोक मूर्तीदान किंवा हौदात विसर्जन करतात, ते श्री गणेशाची अवकृपाच ओढवून घेतात. शाडू मातीची, नैसर्गिक रंग असलेली मूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने कुठलेच प्रदूषण होत नाही. मूर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्व कृती धर्मशास्त्रानुसार केल्याने सर्वांनाच गणेशाचा आशीर्वाद मिळेल. सात्त्विक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला, तर परिणामी राष्ट्र आणि धर्म हानी टाळ्यासही प्रोत्साहन मिळेल. गणेशोत्सव सात्त्विक पद्धतीने साजरा करता येण्यासाठी त्याच्या चरणीच प्रार्थना करूया !

– सौ. प्रज्ञा जोशी, देवद, पनवेल.