Delhi High Court : न्यायालयातील केवळ निकालच नव्हे, तर विनोदही आपल्याला वाचायला मिळणार !
नवी देहली – न्यायालयातील निकाल आणि सुनावण्या आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. आरोप-प्रत्यारोपांच्या या गंभीर वातावरणात घडलेले विनोदही आता आपल्याला कळणार आहेत. देहली उच्च न्यायालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच देहली उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयीन कामकाजाच्या वेळी घडलेले विनोदही वाचायला मिळणार आहेत.
१. दल्ली उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर लवकरच न्यायदान कक्षातील अनपेक्षित विनोदी क्षणांच्या कथा असणारे एक नवे पृष्ठ जिोडण्यात येणार आहे. या पृष्ठावर न्यायालयातील विनोदी घटना, संवाद पोस्ट केले जाणार आहेत.
२. ‘न्यायदान कक्ष (कोर्टरूम) हे विनोदाचे सुपीक स्रोत आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी विशेष ई मेल आयडी बनवण्यात आला आहे.
३. अधिवक्ते, याचिकाकर्ते आणि साक्षीदार न्यायदान कक्षात घडलेल्या मजेदार घटना आणि विनोद यांची देवाण-घेवाण या मेल आयडीवर पाठवू शकतात. ‘ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील’, असे देहली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
गंभीर सुनावण्यांच्या वेळी घडलेल्या विनोदांचे जतन करणार
नियमित ताण-तणावाच्या कामकाजातही कधी वकील किंवा न्यायाधीश यांच्या विनोदी बुद्धीमुळे तर कधी वादी, प्रतिवादी किंवा साक्षीदार यांच्या टिपणीमुळे विनोद घडतात. ‘ह्युमर इन कोर्ट’ (न्यायालयातील विनोद) हा देहली न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) समितीचा प्रकल्प आहे. गंभीर सुनावणीतील विनोदी क्षणांचे भावी पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश यामागे आहे.
संकेतस्थळावरील हे पृष्ठ अद्याप पूर्णपणे कार्यान्वित व्हायचे आहे. तथापि त्यात आतापर्यंत ५ विनोद प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यांपैकी एक स्वतः न्यायमूर्तींनीच लिहिला आहे.
न्यायमूर्तींनी लिहिलेला विनोद
या विनोदात अधिवक्ते आणि न्यायमूर्ती यांच्यातील संवाद लिहिला आहे.
वरिष्ठ वकील ‘क्ष’ : न्यायमूर्ती महोदयांनी कृपा करून आता पेपर बूकच्या पान ६ वर यावे आणि डाव्या स्तंभावरील तारा (स्टार) पाहावा.
न्यायमूर्ती : मिस्टर क्ष, मला तारे केवळ संध्याकाळी ७ नंतरच आकाशात दिसतात. तुम्ही ज्याचा संदर्भ देत आहात ते ‘तार्याचे चिन्ह’ आहे. (६ सप्टेंबर या दिवशी न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी लिहिलेला विनोद)