Bengal Doctors Strike Continues : कनिष्‍ठ डॉक्‍टरांचा संप चालूच !

  • कोलकाता येथील बलात्‍कार आणि हत्‍येचे प्रकरण

  • ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्‍या चर्चेला डॉक्‍टर अनुपस्‍थित !

  • बॅनर्जी दीड घंटा वाट पाहून निघून गेल्‍या !

कोलकाता – येथील राधा गोबिंद कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयात ९ ऑगस्‍ट या दिवशी एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरवर बलात्‍कार करून तिच्‍या करण्‍यात आलेल्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी कनिष्‍ठ डॉक्‍टरांचा संप ३२ व्‍या दिवशीही चालूच आहे. आरोग्‍य विभागाने १० सप्‍टेंबरला डॉक्‍टरांना बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीसाठी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जीही आल्‍या होत्‍या. त्‍यांनी अनुमाने दीड घंटा डॉक्‍टरांच्‍या शिष्‍यमंडळाची वाट पाहिली; पण ते न आल्‍याने ममता बॅनर्जी निघून गेल्‍या.

डॉक्‍टरांनी बैठकीला येण्‍यास नकार देण्‍यामागचे कारण स्‍पष्‍ट करतांना सांगितले की, आम्‍ही ज्‍यांचे (आरोग्‍य विभागाचे मुख्‍य सचिव) त्‍यागपत्र मागत आहोत, तेच आम्‍हाला बैठकीसाठी बोलावत आहेत. हा आमच्‍या आंदोलनाचा अपमान आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशांनंतरही डॉक्‍टरांचे आंदोलन चालूच !

१० सप्‍टेंबरला कामावर रूजू होण्‍याच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशांनंतरही डॉक्‍टरांनी आंदोलन चालूच ठेवले. त्‍यांनी आरोग्‍य भवनापर्यंत मोर्चा काढून आंदोलन केले. या वेळी सर्व डॉक्‍टर्स रात्रभर चालले. या वेळी पीडितेचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पीडितेच्‍या आईने सांगितले की, माझी सहस्रो मुले रस्‍त्‍यावर आहेत. त्‍यामुळे मी घरी राहू शकले नाही.

हत्‍येच्‍या प्रकरणी न बोलण्‍याची मंत्र्यांना तंबी !

सूत्रांनी दिलेल्‍य माहिनीनुसार कोलकात्‍यातील बलात्‍कार आणि हत्‍येच्‍या प्रकरणी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी वगळता कुणीही या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त न करण्‍याची तंबी मंत्र्यांना राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत देण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिला डॉक्‍टरच्‍या बलात्‍काराचे प्रकरण ज्‍या संवेदनशून्‍यतेने हाताळले, त्‍यावरून जनतेमध्‍ये संताप्‍त भावना आहेत. केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांची अन्‍यायी राजवट समाप्‍त करत राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !