विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाचा वाढीव भत्ता सरकारने नाकारला !
मुंबई – विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या गृहरक्षक दलाकडून गृह विभागाकडे मागणी करण्यात आली होती. याविषयी गृहरक्षक दलाच्या महासंचालकांकडून गृहविभागाला पत्र पाठवले आहे; मात्र विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाच्या भत्त्यात वाढ करण्यास गृहविभागाने नकार दिला आहे. याविषयीचे गृहविभागाकडून गृहरक्षक दलाला पाठवलेले उत्तर सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आले आहे.
राज्याच्या गृहविभागाकडून १ ऑगस्ट या दिवशी पत्राचे उत्तर गृहरक्षक दलाला पाठवण्यात आले आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक भार फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत आहे, असे गृहविभागाने गृहरक्षक दलाला कळवले आहे.