गतवर्षी १ मूर्तीदान होऊनही मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) नगरपालिकेचा मूर्तीदानाचा अट्टहास का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – गतवर्षी केवळ १ मूर्तीदान झालेले असतांना यंदा परत मलकापूर नगरपालिका धर्मशास्त्रसंमत नसलेली मूर्तीदान मोहीम का राबवत आहे ? मलकापूर येथे शहरातील मैलामिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते, त्यासाठी नगरपालिका प्रशासन काय करत आहे ? असे प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनी विचारल्यावर मलकापूर नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी कोणतेही समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मलकापूर नगरपालिकेने मूर्तीदान मोहीम राबवू नये, तसेच श्री गणेशमूर्ती विसर्जन कुंड ठेवू नयेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी निरुत्तर झाले. मुख्याधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन आश्पाक बागवान यांनी स्वीकारले.
या वेळी माजी नगराध्यक्ष श्री. उदयसिंह कोकरे-देसाई, माजी नगरसेवक श्री. राजू प्रभावळकर, माजी नगरसेवक श्री. सुधाकर पाटील, माजी नगरसेवक श्री. महेश कोठावळे, श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, सर्वश्री आदित्य पाटील, विश्वास पाटील, जितेंद्र पंडित उपस्थित होते.
शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी १९८ कुंड ठेवण्यात येणार !कोल्हापूर महापालिकेची हिंदु धर्मशास्त्र विसंगत कृती ! कोल्हापूर – पंचगंगा नदी, तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये; म्हणून महापालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागांत विविध ठिकाणी १९८ श्री गणेशमूर्ती विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड आणि मंडळे यांच्या वतीने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी यंदाही इराणी खण येथे कृत्रिम यंत्र बसवण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने श्री गणेशमूर्ती संकलनासाठी १४५ टेंपो, ४५० हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ५ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. |
संपादकीय भूमिकाविविध नाले, साखर कारखाने यांद्वारे नदीत मिसळणारे सांडपाणी यांवर कोणत्याही उपाययोजना न काढता महापालिका कथित प्रदूषणाचा कांगावा करत धर्मशास्त्र संमत नसलेली कृत्रिम कुंड संकल्पना राबवते, तसेच हिंदु भाविकांचा विरोध असतांनाही कृत्रिम यंत्राद्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचे मोल नसल्याचे दाखवून देत आहे, हे लक्षात ठेवा ! |