सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन !
सातारा, १० सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले.
बैठकीमध्ये खालील विषयावर चर्चा झाली…
विसर्जन मिरवणुकीमध्ये डेसिबलचे बंधन पाळून स्वयंशिस्तीने मिरवणूक वेळेत पूर्ण करणे, गणेशोत्सवाच्या परंपरेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे, आदी सूत्रांवर चर्चा झाली. तसेच उपस्थित गणेश भक्तांनी पोलीस आणि प्रशासनाला काही सूचना केल्या. यामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची डागडुजी करणे, पोलीस विभागाचे लागणारे सहकार्य, डॉल्बी मालक अथवा डॉल्बी संयोजक यांच्यामध्ये स्पर्धा लागते, ती टाळणे, मिरवणुकीमध्ये अंतर पडणार नाही याची काळजी घेणे, विसर्जन मिरवणुकीमध्ये बिभत्स आणि अश्लील नृत्य टाळणे, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर नोंद असलेले गुन्हे मागे घेणे…..
या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणारी एक सुकाणू समिती स्थापनेचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. समितीचे पदाधिकारी निवडणे, समितीने गणेशोत्सवचे नियमन करणे, नियमावली बनवून ती कार्यरत करणे, तसेच पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधून आदर्श गणेशोत्सव मिरवणुकीचे नियोजन करणे, अशी व्याप्ती ठरवून घेण्यात आली.