जपानमधील गणपति मंदिरे आणि त्यांची वैशिष्ट्ये !
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त विशेष…
जपानमध्ये अनेक लाकडी बौद्ध मंदिरांपेक्षाही सहस्रो वर्षे अनेक जुनी मंदिरेही आहेत. यांतील एका मंदिरात ठेवलेल्या देवतेची मूर्ती हिंदु देवता गणेशासारखीच आहे. ‘मत्सुचियामा शोतेन’ नावाच्या या मंदिरात ठेवलेली मूर्ती ही प्रत्यक्षात भगवान गणेशाची जपानी आवृत्ती आहे, ज्याची पूजा तंत्र-मंत्रावर विश्वास असलेले बौद्ध लोक करतात. ८ व्या शतकात बांधलेल्या या मंदिरातील देवता भारतातील ओडिशा येथून आल्याचे मानले जाते.
१. जपानमध्ये ८ व्या शतकापासून गणपतीची केली जाते पूजा !
धर्माविषयी संशोधन करणार्यांचा असा विश्वास आहे की, ८ व्या शतकात जपानमध्ये गणेशाची प्रथमच पूजा होऊ लागली. याविषयी विश्वास ठेवणारे केवळ बौद्ध लोक होते, ज्यांचा मंत्र बौद्ध धर्मावर (शिंगोन) विश्वास होता. ही बौद्ध धर्माची एक शाखा आहे, ज्याचे अनुयायी तांत्रिक शक्तींची पूजा करतात.
जपानमध्ये गणेशावर (कांगितेन) विश्वास ठेवणार्यांची संख्या वाढतच गेली. त्याला एक ‘शक्तीशाली देव’ म्हणून पाहिले जात होते आणि तंत्रमंत्राच्या साहाय्याने शुद्ध राहून त्याची पूजा विशिष्ट पद्धतीने केली जात होती. आता बौद्ध धर्माचे पालन करणार्या जपानमध्ये गणेशाची अनेक मंदिरे आढळतात. इतिहासानुसार येथे एकूण २५० गणेश मंदिरे आहेत; परंतु त्यांना जपानमध्ये ‘कांगितेन’, ‘शोटेन’, ‘गणबाची (गणपति)’ आणि ‘बिनाकातेन (विनायक)’, अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.
२. सजवलेल्या लाकडी पेटीत ठेवला जातो गणपति !
तांत्रिक बौद्ध धर्मात भगवान गणेशाला मादी हत्तीभोवती गुंडाळलेले दाखवले आहे. याला ‘शक्ती’ म्हणतात. हे स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून निर्माण होणार्या ऊर्जेचे प्रतीक आहे; मात्र काही कारणांमुळे मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा चित्र दिसत नाही. तो एका सजवलेल्या लाकडी पेटीत ठेवला जातो, ज्याची प्रतिदिन पूजा केली जाते. केवळ विशेष प्रसंगी मूर्ती बाहेर काढून सर्वांसमोर पूजा केली जाते.
३. अडचणी दूर करणारा देव
महत्त्वाचे म्हणजे जपानी कांगितेन हे भारतीय गणेशासारखेच आहे. त्याला अडचणी दूर करणारा देवही मानला जातो आणि तांत्रिक बौद्ध हे काम चालू करण्यापूर्वी त्याची पूजा करतात. जपानी व्यापारीही या गणेशाची पूजा करतात.
४. जपानमधील सर्वांत मोठे आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक ‘होझान-जी’ मंदिर !
जपानमधील इकोमा पर्वतावर सर्वांत मोठ्या गणेश मंदिराचे नाव ‘होझान-जी’ आहे. हे ओसाका शहराच्या बाहेर दक्षिण भागात वसलेले आहे. १७ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराविषयी अनेक कथा सांगितल्या जातात आणि स्थानिक लोक अन् संपूर्ण जपानमध्ये या मंदिराची ओळख आहे. विशेषत: येथील व्यापारी त्याचा अधिक विचार करतात. भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर येथे भरपूर देणग्या दिल्या जातात, ज्यात प्रामुख्याने जपानी चलन असते. याखेरीज दागिनेही दिले जातात. याच कारणामुळे हे मंदिर जपानमधील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दुकानांमध्येही भारताच्या धर्तीवर गुंफलेली दोन हत्तींची मूर्ती उपलब्ध आहे, जेणेकरून लोक घरी मूर्तीची पूजा करू शकतील.
– हर्षदा पाटोळे (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)