करंझाळे (गोवा) येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून समुद्रकिनार्यावर दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतरची घटना
पणजी, १० सप्टेंबर (वार्ता.) – करंझाळे समुद्रकिनार्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून किनारी आल्या आहेत. ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. अंदाजे ५-६ श्री गणेशमूर्ती पाण्यात तरंगतांना दिसत आहेत. दीड दिवसांच्या विसर्जनानंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची राज्यात विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरपणे पालन करणार असल्याचे म्हटले होते; मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती नाही.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने करंझाळे येथील समुद्रकिनार्यावर वाहून आलेल्या मूर्तींची घेतले नमुने
पणजी – श्री गणेशमूर्ती वाहून आल्याच्या घटनांची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. मंडळाच्या पथकाने १० सप्टेंबर या दिवशी समुद्रकिनारी भेट देऊन तेथे वाहून आलेल्या श्री गणेशमूर्तींचे नमुने घेतले आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना मंडळाच्या शास्त्रज्ञ डेंजा कार्दोझ म्हणाल्या, ‘‘मूर्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत आणि त्यानंतरच या मूर्ती चिकणमातीपासून बनवल्या होत्या कि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून, हे सिद्ध होणार आहे.’’
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात रोखण्यास सरकारला अपयश ! – आमदार विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड
मडगाव – श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात रोखण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याची सरकारने घोषणा केली होती; मात्र ही घोषणा कागदावरच राहिली. समुद्रकिनार्यांवर श्री गणेशमूर्ती वाहून आल्याने गोमंतकियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि सरकार या प्रकरणी असंवेदनशील आहे.’’ (गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती केवळ आयात केलेल्या नाहीत, तर काही मूर्तीकार त्या गोव्यातच बनवत आहेत. हे मूर्तीकार चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठीचे सरकारी अनुदानही लाटत आहेत. त्यामुळे सर्व श्री गणेशमूर्ती शाळांची श्री गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी तपासणी करायला हवी ! – संपादक)