श्री गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केल्यानंतर भूमीच्या संदर्भात दीर्घ काळ रखडलेली कामे अल्पावधीत पूर्ण झाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

१. भूमीवर वारसा हक्कानुसार नावे लावण्याचे काम ९ वर्षे न होणे आणि या कामातील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची उपासना करण्याचा विचार मनात येणे

‘वर्ष २०१४ मध्ये एकदा आम्ही नाशिक येथील एका वडिलोपार्जित भूमीवर नाव लावण्यासाठी तहसील कार्यालयात कागदपत्रे दिली होती; परंतु काही ना काही अडचणींमुळे हे काम होत नव्हते. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये मी आणि माझी बहीण (सुश्री (कु.) दीपाली होनप) या कामासाठी गोव्याहून नाशिक येथे गेलो होतो. तेथे एक मास थांबूनही काम पुढे सरकत नव्हते. तेव्हा ईश्वराच्या कृपेमुळे माझ्या मनात विचार आला, ‘या कामात आध्यात्मिक अडथळे आहेत. ते दूर होण्यासाठी येत्या बुधवारी गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करत गणपतीच्या मूर्तीला जलाभिषेक करावा.’ त्यानुसार मी नियोजन केले.

१ अ. गणपतीला जलाभिषेक करतांना ‘गणेशमूर्तीतून सूक्ष्मातून यंत्रे बाहेर पडत असून ती भूमीच्या कामातील अडथळे दूर करत आहेत’, असे जाणवणे : बुधवार गणपतीचा मानला जातो. त्यामुळे मी डिसेंबर २०२३ मध्ये एका बुधवारी गणपतीला जलाभिषेक करण्याचे ठरवले. त्यापूर्वी मी श्री गणेशाला प्रार्थना केली, ‘भूमीच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे साधनेसाठी गोव्याला आश्रमात जाता येत नाही. सर्व अडथळे तू दूर कर.’ त्यानंतर गणपतीला जलाभिषेक करतांना मी, माझी बहीण (सुश्री (कु.) दीपाली होनप) आणि भाऊ (श्री. सुरेंद्र होनप) यांनी गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली. तेव्हा ‘गणेशमूर्तीतून गणपतीच्या दैवी यंत्रांच्या विविध आकृत्या बाहेर पडत आहेत आणि त्या भूमीच्या कामातील अडथळे दूर करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून जाणवले.

श्री. राम होनप

१ आ. गणपतीला अभिषेक केल्यावर पुढील ८ दिवसांतच तहसीलदारांनी भूमीवर साधकांची नावे लावण्याचा आदेश देणे : पुढील बुधवारी मी तहसील कार्यालयात गेलो. तेथे मी तहसीलदारांना ‘माझे काम वर्ष २०१४ पासून प्रलंबित आहे’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कुठल्याही परिस्थितीत आजच तुमचे काम पूर्ण करून देतो.’’ त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तहसीलदारांनी भूमीवर आमची नावे लावण्याच्या आदेशाची प्रत मला दिली. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात बुधवारी गणपतीला अभिषेक केला. त्याच्या पुढील बुधवारीच महत्त्वाचे काम झाले होते.

२. तहसीलदारांनी आदेश देऊनही ७/१२ च्या उतार्‍यावर नावे लागण्यास अनेक अडचणींमुळे विलंब होणे

तहसीलदारांनी भूमीवर नावे लावण्याच्या आदेशाची प्रत मला दिली होती. त्यानंतर भूमीच्या ७/१२ च्या उतार्‍यावर (टीप) आमच्या नावांची नोंद झाली की, आमचे काम पूर्ण होणार होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण ८ दिवस लागणार होते. ‘हे काम झाले की, गोव्याला परत जाऊया’, असा विचार करून मी नाशिकला आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरवले; परंतु एक मास झाला, तरी हे काम झाले नाही.

टीप – ७/१२ चा उतारा : हा उतारा ‘विशिष्ट भूमीवर मालकी हक्क कुणाचा आहे ?’, हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागाच्या वतीने दिला जातो.

२ अ. गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करतांना श्री गणेश कामातील अडथळे सूक्ष्मातून दूर करत असल्याचे जाणवणे : तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘कामातील अडथळे दूर होण्यासाठी ११.१.२०२३ या दिवशी, म्हणजे बुधवारी गणपतीला जलाभिषेक न करता केवळ २१ वेळा गणपति अथर्वशीर्ष म्हणावे.’ त्यानुसार मी आणि माझी बहीण (सुश्री (कु.) दीपाली होनप) यांनी ही आवर्तने केली. गणपति अथर्वशीर्ष म्हणत असतांना ‘त्या स्तोत्रातून श्री गणेशाच्या दैवी ऊर्जेची निर्मिती होत असून ती सूक्ष्मातून भूमीच्या कामातील अडथळे दूर करत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. अथर्वशीर्षाची आवर्तने केल्यानंतर ८ दिवसांच्या आत ७/१२ च्या उतार्‍यावर वारसा हक्काच्या नोंदीचे काम पूर्ण होणे : २१ वेळा अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर १६.१.२०२३ या दिवशी, म्हणजे सोमवारी मी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना भेटलो. मी त्यांना वरील अडचण सांगितली. त्यांनी लगेच तलाठ्यांना भ्रमणभाष केला आणि त्यांना दुसर्‍याच दिवशी माझे काम करून देण्याविषयी सूचना केली.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत मी तहसील कार्यालयात ७/१२ च्या उतार्‍यावर आमच्या नावांची नोंद होण्यासाठी थांबलो आणि दुपारी २ वाजता श्री गणेशाच्या कृपेमुळे ७/१२ च्या उतार्‍यावर आमची नावे लागली. आमचे काम पूर्ण झाले. तेव्हा लक्षात आले, ‘बुधवारी गणपतीची उपासना केली. त्याचे फळ त्याने ८ दिवसांच्या आतच आम्हाला दिले.’

‘श्री गणेशाने कृपा केल्याने वर्ष २०१४ पासून रखडलेले काम पूर्ण केले आणि आमच्या साधनेचा वेळ वाचवला’, याविषयी माझ्याकडून श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक