सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी असतांना शिकायला मिळालेली सूत्रे
सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काही वर्षे सेवा करत होत्या. त्यांचा साधनेचा आरंभ, त्यांनी केलेली सेवा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रथम भेट होणे आणि साधनेला आरंभ करणे
वर्ष अंदाजे १९९३ – ९४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे (प.पू. डॉक्टरांचे) पेण, जिल्हा रायगड येथील राममंदिरात मार्गदर्शन होते. मला साधनेविषयी काहीच ठाऊक नव्हते; तरीही मला त्यांच्या भेटीची ओढ लागली होती. त्यांच्या भेटीसाठी जातांना मला पुष्कळ अडथळे आले; परंतु त्यांना भेटण्याचा माझा निर्धार पक्का होता. मी राममंदिरात जाऊन तेथील झाडलोट केली. तेव्हा एक व्यक्ती मला म्हणाली, ‘‘अरे वा ! तुम्ही रामाची सेवा करत आहात. राम तुमचे भले करेल.’’ ते कोण होते, ते मला कळलेच नाही. माझी प.पू. डॉक्टरांशी भेट पेण (रायगड) येथील राममंदिरात झाली. मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांसमोर बसले होते. तेव्हा ‘त्यांच्या चरणांतून काहीतरी प्रक्षेपित होत आहे. त्यांच्यात काहीतरी वेगळे आहे’, असे वाटून माझे डोळे सतत मिटले जात होते. त्या वेळी मला ध्यान इत्यादी कळत नव्हते. त्या दिवसापासून मी साधनेला आरंभ केला.
२. घर सोडून बाहेरगावी कधीही न जाणे; परंतु प.पू. डॉक्टर यांच्या घरी पुष्कळ दिवस गृहकृत्य साहाय्यक म्हणून सेवा करणे
मी खोपटे, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रहात होते. ‘प.पू.डॉक्टरांच्या मुंबई येथील घरी एका गृहकृत्य साहाय्यकाची आवश्यकता आहे’, असे मला माझी बहीण श्रीमती राजश्री भगत (खोपटे, उरण, जिल्हा रायगड) हिच्याकडून कळले. माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी प.पू. डॉक्टरांच्या घरी ‘गृहकृत्य साहाय्यक’ म्हणून गेले. मी कुटुंबियांना सोडून प्रथमच बाहेरगावी गेले होत. मी तिथे ८ दिवसांसाठी म्हणून गेले होते; परंतु मी साडेतीन मास (महिने) तिथे राहिले. त्यानंतर प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तू पुष्कळ दिवस घरी गेली नाहीस; म्हणून मी तुला तुझ्या घरी सोडण्याचे नियोजन करतो.’’ त्यानंतर त्यांनी मला पनवेल येथील बसस्थानकावर सोडले आणि मी घरी गेले. त्यानंतर तिसर्या दिवशी माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी प.पू. डॉक्टरांच्या पनवेल येथील मार्गदर्शनाला आले. तेथून मी पुन्हा प.पू. डॉक्टरांच्या समवेत त्यांच्या घरी परत आले.
३. प.पू. डॉक्टरांच्या घरी प्रथम गेल्यावर ‘प.पू. डॉक्टर राम आहेत’, असे जाणवणे
मी २७.९.१९९७ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या घरी प्रथम गेले होते. त्यांच्या सदनिकेत माझे एक पाऊल आत आणि एक पाऊल बाहेर असतांना मला प.पू. डॉक्टरांचे दोन्ही तळपाय गुलाबी रंगाचे दिसले. तेव्हा माझ्या आतून आवाज आला, ‘हाच तो माझा राम ! आता या रामाचे चरण सोडायचे नाहीत.’
४. प.पू. डॉक्टरांची गुणवैशिष्ट्ये
४ अ. त्यांची रहाणी अतिशय साधी होती.
४ आ. इतरांचा विचार करणे : ते नेहमी इतरांचा विचार करत असत. मी घरी जायला निघाले की, ते मला खर्चासाठी पैसे देत. ते मी त्यांना परत केले.
४ इ. सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता : एकदा मी घरी जायला निघाले. तेव्हा प.पू. डॉक्टर झोपले होते. मी त्यांना न सांगता सेवाकेंद्रातून बाहेर पडत होते. अकस्मात् प.पू. डॉक्टर झोपेतून उठले आणि ते मला निरोप देण्यासाठी आले. यावरून ‘प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून सर्व काही कळते’, हे माझ्या लक्षात आले. मी बसस्थानकावर पोचेपर्यंत ते मला आगाशीतून (गॅलरीतून) हात हालवून निरोप देत होते.
५. मुंबई सेवाकेंद्रात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
अ. मी खेडेगावातून येथील मुंबई सेवाकेंद्रात सेवा करायला आले होते. तरीही मला प.पू. डॉक्टरांनी एवढे चांगले सांभाळले की, मी ३ वर्षे घरी गेले नाही.
आ. मी मुंबई सेवाकेंद्रात स्वयंपाक बनवण्याची सेवा करत होते. तेव्हा मला अन्नपदार्थांविषयी आवड किंवा आसक्ती नव्हती. माझे गुरु प.पू. डॉक्टर अत्यंत समाधानी होते; म्हणून मीही समाधानी होते’, असे मला वाटले.
इ. सेवाकेंद्रातील साधक एकमेकांविषयी कधीही विकल्प पसरवत नसत.
ई. प.पू. डॉक्टरांची, म्हणजे गुरूंची स्पंदने सेवाकेंद्रात जाणवत असत. त्यामुळे साधक नेहमी अंतर्मुख असत.
६. सेवा करतांना ‘देवाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे
आरंभी मी मुंबई सेवाकेंद्रात ‘केवळ काम करत आहे’, असे मला वाटत होते. त्यानंतर ‘मी देवाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवत असे. मी सवलत न घेता प्रामाणिकपणे सेवा केली.
७. प.पू. डॉक्टरांकडून मला अनेक गुण शिकायला मिळाले. त्या गुणांचा उपयोग मला साधना आणि सेवा करतांना होत आहे, उदा. काटकसरीपणा.
८. नातेवाइकांनी साधनेला विरोध करणे
माझ्या आईला नातेवाईक बोलायचे, ‘तुमची मुलगी लग्न न करता इतकी वर्षे कुठे आणि कशी रहाते ?’ त्या वेळी माझ्या आईने नातेवाइकांचे बोलणे सहन केले. तिने कधीच कुणाकडे गार्हाणे केले नाही.
९. स्वतःमध्ये झालेले पालट
वर्ष २००३ पासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. मी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांसंबंधी सेवा करत आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने माझ्यात पुढील पालट झाले आहेत.
अ. मला सारणी (टीप) लिहायला आवडू लागले आहे.
टीप : दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीमध्ये लिहून त्या त्या चुकीसमोर योग्य दृष्टीकोन किंवा योग्य कृती यांविषयी सूचना लिहिणे.
आ. कुणी कसेही वागले, तरी मी त्यांच्याशी चांगलेच वागते.
इ. ‘प.पू. डॉक्टरांनी मला साधनेत आणले आहे. तेव्हा मला साधनाच करायची आहे. मला साधनेचा पाया समजला आहे. काहीही झाले, तरी मला साधना सोडायची नाही’, हा विचार माझ्या मनात सदैव असतो.
ई. मी इतरांना साधनेत साहाय्य करत आहे. मी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहे.
उ. मला आतापर्यंत प.पू. डॉक्टरांनी जे शिकवले आहे, ते मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. सेवा करतांना ‘मी त्यांच्या चरणांची सेवा करत आहे आणि या सेवेतून माझी साधना होणार आहे’, असा मी भाव ठेवते.
१०. कृतज्ञता
प.पू. डॉक्टरांविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. १९९७ ते २०२४ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी मला साधनेत टिकवून ठेवले आहे. हे कसे झाले ?, ते मलाच कळले नाही. ‘यापुढेही त्यांनी मला असेच त्यांच्या चरणांशी ठेवावे’, अशी शरणागत आणि कृतज्ञता भावाने प्रार्थना !’
– सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.३.२०२४)
|