आयुर्वेदामधील आहाराचे मूळ नियम पाळा !

आपले शरीर हे ५ कोशांनी बनलेले आहे, त्यातीलच एक आहे अन्नमय कोश ! यातून सिद्ध होते की, आहार हा आपल्या शरिराचा अविभाज्य भाग तर असतोच, त्यासह तो माणसाचे मनही सत्त्व बनवतो. आपण काय खातो, यावर आपले विचार बहुतांशी अवलंबून असतात. भारतीय आहारशास्त्राचा उगम हा भारतीय वैद्यक किंवा आयुर्वेद यांमध्ये आहे. आयुर्वेदामधील मूळ आहारी नियम जर आपण पाळले, तर डॉक्टरकडे जायची फारशी आवश्यकता पडणार नाही हे नक्की !

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे की, प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे त्याच्या खाण्या-पिण्याचे नियम हे वेगळे करायला लागतील. दिनचर्या, कामाची पद्धत यांप्रमाणे सुद्धा आहाराची आवश्यकता पालटू शकते. एखाद्या माणसाला एखादा पदार्थ आवश्यक असेल, तरी तो दुसर्‍याला असेलच, असे नाही. तरीही सर्वांसाठी आहाराचे काही नियम हे समानच आहेत.

आहाराचे काही नियम

१. सकाळी पोट साफ होणे सर्वांत महत्त्वाचे. पोट साफ होत नसेल, तर रात्री झोपतांना दूध-तूप, कोमट पाणी-तूप, मनुकांचा काढा इत्यादी घेऊन पोट साफ होईल, असे घ्यावे. पोट साफ नसेल, तर नंतर खाल्लेले नीट पचणार नाही.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. ‘न्याहरी भरभक्कम असावी’, असा सध्याची पद्धत (ट्रेंड) आहे; पण जर भूक नसेल, तर न्याहरी करू नये. त्याऐवजी १ कप गायीचे दूध घेऊ शकता. थंडीच्या ऋतूमध्ये बाकी सगळी प्रकृती ठीक असता भरभक्कम न्याहरी करावी.

३. प्रत्येक २ घंट्यानी थोडे थोडे खाणे, म्हणजे अर्धवट शिजलेल्या भातात नवीन तांदूळ घालून शिजवण्यासारखे आहे. आधीचे आणि नवीन काहीच नीट पचत नाही. दुपारची जेवणाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ यामध्ये आणि रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास, म्हणजे सायंकाळी ७ ते रात्री ८ यामध्ये असावे.

४. दुपारच्या जेवणात सर्व रस असतील, असे पहावे. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सर्व चवी असाव्यात. मधुर किंवा गोड रस हा प्रामुख्याने असावा. गहू आणि तांदूळ हे गोड रसात येतात.

५. काही जण फक्त ‘सॅलड’ (कोशिंबीर) आणि कॉफी किंवा उसळ अन् फळे असे जेवण करतात. त्याने वजन न्यून व्हायला साहाय्य होत असेल कदाचित; पण शरिरातील अग्नीसाठी ते हानीकारक आहे. कोरडेपणा वाढतो, वात वाढतो, आम्लपित्त, ढेकर, पोटफुगीसारखे त्रास साधारणपणे या प्रकारच्या सततच्या जेवणाने होतात. एवढे करून ते तुम्ही बराच काळ घेऊसुद्धा शकत नाही. भात, डाळ, पोळी/भाकरी, भाजी असे चौरस जेवण असावे. यासमवेत चटणी असेल, तरी चालेल. ताक दुपारच्या जेवणात तरी आवर्जून ठेवावे. ते घरी केलेलेच असावे. कफ किंवा घसा यांचे विकार असणार्‍यांनी रात्रीच्या वेळी दही किंवा ताक टाळावेच.

६. चांगल्या पद्धतीने अन्न पचण्यासाठी आले आणि सैंधव जेवणाच्या आधी खावे. जेवणाचा प्रारंभ हा गोड पदार्थाने करावा. सर्व धान्ये ही गोड रसात येतात. भात, भाकरी किंवा पोळी काहीही चालेल.

७. आंबट आणि खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये मध्ये तोंडी लावून खावेत. यामध्ये चिंच-खजूर चटणी, कढीपत्ता चटणी, आल्याची चटणी, भात-वरणमधील मीठ, कोथिंबीर, लिंबू, चटणी, ताक हे पदार्थ येतील.

८. जेवणाच्या शेवटी कडू आणि तिखट पदार्थ असावेत. यामध्ये इतर भाज्या, त्यातील मसाले, फोडणीत घातलेले मेथी दाणे, मोहरी, हळद, हिंग, पंचामृत भाज्या, चटण्या इत्यादी पदार्थ येतात. तांबूल (खायचे पान) किंवा मुखवास धारण करावे.

९. संध्याकाळचे जेवण सूर्यास्ताच्या आधी किंवा आसपास घेतले तर उत्तम. यामुळे पचन चांगले होते. जर भूक नीट लागत नसेल आणि कामाच्या आवश्यकतेप्रमाणे जर दुपारी ४-५ वाजता खाणे होत असेल, तर रात्री केवळ मुगाचे कढण घेणे उत्तम !

१०. जेवणानंतर फळे खाऊ नयेत. दोन जेवणांच्या मध्ये खावीत. शक्यतो जिथे तुम्ही रहाता तेथीलच फळे खावीत.

११. आंबवलेले पदार्थ, पनीर, दही हे पदार्थ कधी कधीच खाल्लेले चांगले.

१२. आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात. यावर संशोधनही झाले आहे.

१३. सध्या जेवण बनवायला बर्‍याचदा माणूस असतो किंवा आस्थापनाच्या उपाहारगृहात खाल्ले जाते. खरे तर तुमच्यासाठी आहार बनवणारी व्यक्ती ही तुमच्याविषयी सद्भावना बाळगणारी असणे महत्त्वाचे आहे. चिडून, रागावून वा दमून जो स्वयंपाक केला जातो, त्याचे शारीरिक आणि मानसिक चांगले परिणाम दिसत नाहीत. म्हणून बाकी साहाय्याला माणूस आणि स्वयंपाक स्वतःच किंवा घरातील व्यक्तीने बनवलेला उत्तम !

१४. थंडी आणि पावसाळा या कालावधीत जेवणासह मध्ये मध्ये कोमट पाणी प्यावे. ताक, कढी, आमटी असे द्रव जेवणात अधिक प्रमाणात असल्यास पुष्कळ पाणी प्यायची आवश्यकता पडत नाही. नुसती भाकरी-भाजी किंवा पोळी-भाजी असतांना मध्ये मध्ये ओलाव्यासाठी थोडे थोडे पाणी प्यावे.

१५. दोन घास कमी खाल्लेले केव्हाही चांगले. न बोलता, पुष्कळ न हसता, मन लावून आणि चव घेत अन्न ग्रहण करावे. सध्याच्या भाषेत ते म्हणतात ना, ‘Mindful eating is healthy eating.’ (अर्थ : लक्षपूर्वक खाणे, हा आरोग्यदायी आहार आहे.)

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

(साभार : वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांचे फेसबुक)