‘पुतळ्यांची उंची किती असावी ?’ याचे सांस्कृतिक धोरण घोषित होणार
मुंबई – मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना झाली. यानंतर राज्यातील सांस्कृतिक विभागाने आगामी सांस्कृतिक धोरणात ‘राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी ?’, याविषयी नियम करण्यासमवेच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ञ समितीने केली. १५ दिवसांत राज्याचे सांस्कृतिक धोरण घोषित होणार असून यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तिचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’ने पुतळ्यासंदर्भातील निकष सुचवले आहेत.
१. या समितीने सुचवलेल्या अन्य शिफारसी
अ. शिल्पाच्या परीक्षणासाठी केवळ शासकीय कलाशिक्षण संस्थेतील शासकीय अधिकारी शिक्षक न ठेवता त्यासोबतच एखाद्या तज्ञाची नेमणूक करावी.
आ. पुतळ्याला हार घालण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी शिड्या उभारण्यात आल्या असून त्यामुळे सौंदर्याला बाधा येते.
२. ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण’ वर्ष २०१० नंतर प्रथमच घोषित होणार आहे. हे सांस्कृतिक धोरण ठरवतांना १० उपसमित्या नेमण्यात आल्या असून त्यात कारागिरी, भाषा, साहित्य आणि ग्रंथव्यवहार अन् वाचनसंस्कृती, दृश्यकला, गडदुर्ग आणि पुरातत्त्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट, भक्तीसंस्कृती यांचा समावेश होता.
३. पुतळ्यांसंदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभागाला पाठवला असून त्यानुसार शिफारशींवर विचार करून अंतिम धोरण सिद्ध होईल. सांस्कृतिक धोरणाची काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी वेगळी समिती नेमली जाईल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
४. सांस्कृतिक धोरण ठरवतांना भौगोलिक, सामाजिक, भाषा अशा सर्वच घटकांचा विचार करून ते सर्वसमावेशक होईल, हे काटेकोरपणे पहाण्यात आले. समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून हे धोरण सिद्ध झाले आहे, असे सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे.