समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य
पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – पुढील मासापासून पर्यटन हंगामाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे प्राधान्य नजरेसमोर ठेवले आहे. यानुसार समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्यासह भ्रमणभाषमधील सुविधांद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच पोलीस दल नेमण्यात येणार आहे.
पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटन विभागाने गोवा येथे गेल्या वर्षी मे मासापर्यंत ४० लाख ८६ सहस्र देशांतर्गत आणि १ लाख ६६ सहस्र विदेशी पर्यटकांची नोंदणी केली आहे. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे शासनाने अनेक पावले उचलली आहेत. नियमांनुसार दलालांवर कारवाई करण्यात येणार आहे. गोवा पर्यटन व्यवसाय नोंदणी अधिनियम कलम २० अनुसार दलालांना ५ सहस्र रुपये दंड आकारला जाईल. (पर्यटकांची सहस्रो रुपयांची फसवणूक करणार्या दलालांना केवळ ५ सहस्र रुपये दंड ? अशाने दलालांना कसा वचक बसणार ? हा किरकोळ दंड म्हणजे फसलेल्या पर्यटकांची आणखी फसवणूक म्हणावी लागेल ! – संपादक) समुद्रकिनार्यांवर जलचर मारले जाण्याच्या घटनाही वाढत आहेत. अशा घटनांची ‘ॲप’च्या माध्यमातून त्वरित माहिती देण्याचे दायित्व ‘टुरिस्ट वॉर्डन’ यांना देण्यात आले आहे, तसेच ही माहिती वन खाते आणि पर्यटन खाते यांनाही देण्यात येणार आहे. ‘बीच व्हिजिल ॲप’च्या माध्यमातून समुद्रकिनार्यांवरील स्वच्छतेसंबंधीच्या समस्यांची माहिती पर्यटन खात्याला तत्परतेने मिळून पर्यटन खाते त्यावर उपाययोजना काढते.