पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिक्षण खात्याची सिद्धता
पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंतच्या सर्वच वर्गांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची सिद्धता शिक्षण खाते आणि राज्य शैक्षणिक संशोधन अन् प्रशिक्षण परिषद (एस्.सी.ई.आर्.टी.) यांनी चालू केली आहे. या धोरणाच्या अंतर्गत पुढील वर्षी इयत्ता तिसरी आणि सहावी यांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार असल्याची माहिती ‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
त्या म्हणाल्या, ‘‘राज्यशासनाने गेल्या २ वर्षांत फाऊंडेशनसह इतर पातळ्यांवरील काही वर्गांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही केली आहे. पुढील वर्षी पहिली आणि दहावी या इयत्तांसाठी हे धोरण लागू करण्याचे निश्चित झालेले आहे. पुढील वर्षी दहावीसाठी अभ्यासक्रम तोच असेल; मात्र अतिरिक्त विषयांचा अभ्यासक्रम ‘एस्.सी.ई.आर्.टी.’कडून सिद्ध करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत येणार्या अभ्यासक्रमांविषयी प्रत्येक स्तरावर मुख्य समित्या अणि उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या इयत्तांनुसार अभ्यास करून अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी मुख्य समित्यांनी उपसमित्यांना कालावधीही निश्चित करून दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूनेच पूर्वप्राथमिकपासून ते दहावीपर्यंत सर्वच वर्गांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या धोरणामुळे शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही पालटणार असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’’