रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापन झालेली सिद्धिविनायकाची मूर्ती घडत असतांनाच्या प्रत्येक टप्प्यातील छायाचित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘सिद्धिविनायकाच्या मूर्तीची स्थापना करावी’, असे महर्षींनी सांगितले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (आताचे पू. (कै.) नंदा आचारी) यांनी दगडाची सिद्धिविनायकाची मूर्ती बनवली. त्यानंतर तिची रामनाथी आश्रमाच्या परिसरात स्थापना करण्यात आली. ही मूर्ती घडत असतांना तिची विविध टप्प्यांवरील छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांचे साधिका सौ. रंजना गौतम गडेकर यांनी सूक्ष्म परीक्षण केले. ९ सप्टेंबरला आपण छायाचित्र क्र. १ चे सूक्ष्म परीक्षण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहू.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/832590.html
२ आ. छायाचित्र क्र. २
१. ‘हे छायाचित्र पहातांना माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवल्या. तेथे चांगली शक्ती खेचली जात असल्याचे जाणवून माझ्या डोक्यात चांगल्या संवेदना जाणवू लागल्या.
२. ‘माझ्या अनाहतचक्राकडेही तो प्रवाह येत आहे’, असे जाणवले.
३. हळूहळू माझे मन निर्विचार झाले आणि माझे ध्यान लागले.
४. ‘दगडात निर्गुण गणपतितत्त्व आकृष्ट होऊन दगडाच्या भोवती त्याचे वलय निर्माण झाले आणि त्यातून गणपतितत्त्वाचे किरण वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
५. ‘दगडात पुष्कळ सकारात्मक शक्ती असून त्या माध्यमातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत. त्यामुळे स्वतःभोवतालची नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन दगडातील सकारात्मक शक्ती ग्रहण होत आहे आणि ही दैवी अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
६. तेव्हा सूक्ष्मातून गणपतीचे मूळ तत्त्व असलेली लाल कापडात गुंडाळलेली वस्तू दगडाला स्पर्श न करता अधांतरी दिसली. नंतर दगडाकडे पाहून माझा ‘ॐ गँ गणपतये नमः ।’, हा नामजप होऊ लागला. तेव्हा ‘सूक्ष्मातून एखादा लिंगदेह स्त्रीच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी पूर्वसिद्धता करतो. गर्भाच्या आजूबाजूला त्याचे वास्तव्य असते’, तसे हे आहे’, असे मला वाटले.
२ इ. छायाचित्र क्र. ३
२ इ १. लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचा स्पर्श दगडाला झाल्यामुळे दगड सगुण गणपतितत्त्वाने भारित होणे : लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूच्या खालच्या भागाचा छायाचित्रातील दगडाला स्पर्श होत असल्याचे मला दिसले. त्यामुळे ‘दगड पूर्णतः गणपतीच्या सगुण तत्त्वाने भारित झाला’, असे मला जाणवले. लाल कापडात असलेल्या गणपतीच्या सगुण तत्त्वाचा स्पर्श दगडाला झाल्यामुळे सगुण गणपतितत्त्वाचे वलय दगडाभोवती निर्माण झाले. ‘ज्याप्रमाणे गर्भाला लिंगदेहाचा स्पर्श होतो, त्याप्रमाणे ही प्रक्रिया आहे’, असे मला जाणवले.
२ ई. छायाचित्र क्र. ४
१. ‘सूक्ष्मातील लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूतील गणपतितत्त्व दगडात पूर्णतः अंतर्भूत झाले’, असे मला जाणवले.
२. माझा गणपतीचा नामजप होत असतांना वैखरी वाणीतील नामजपाप्रमाणे माझे त्याच्या उच्चारांकडे पूर्ण लक्ष जात होते. ‘दगडात गणपतीचे सगुण रूप साकार होण्याची वेळ आल्याने असा नामजप होत आहे’, असे मला वाटले.
३. तेथे मूळ दगड न दिसता पांढरा पिवळसर प्रकाशमान गोळा दिसला. ‘त्यातील शक्ती प्रकाशाच्या रूपाने वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
४. ‘लिंगदेह स्त्रीच्या गर्भाच्या बिजात प्रवेश करतो. बाळाला गर्भातच रूप आणि आकार प्राप्त होतो’, त्याप्रमाणे हे आहे’, असे मला जाणवले.
२ उ. छायाचित्र क्र. ५
१. चंदेरी आणि पिवळसर सोनेरी रंगाचे किरण असलेल्या बाह्यरेषेने (‘आऊटलाईन’ने) गणपतीचा सूक्ष्मातील आकार दगडावर रेखाटलेला दिसला. ‘पुढे मूर्ती कशी सिद्ध होणार आहे ?’, हे त्या आकारावरून आधीच स्पष्ट होत होते.
२. ‘गणपतीने दगडावर आपले सूक्ष्मातील रूप धारण केले असून तो त्या दगडाला स्पर्श न करता दगडापाशी अधांतरी उभा आहे’, असे मला दिसले. मूर्तीकार दगडाला जसजसा आकार देत होता, तसतसा मला सूक्ष्मातून दिसत असलेला गणपतीचा आकार त्यावर प्रगट होत होता, उदा. गणपतीच्या डोक्याचा आकार सिद्ध झाल्यावर मला त्यावर सूक्ष्मातील गणपतीचे डोके दिसले.
३. ‘एखादे नुकतेच जन्मलेले तान्हे बाळ झोपले असून ते पुष्कळ आनंदी आणि दैवी आहे’, असे छायाचित्राकडे पाहून मला वाटले. मूर्ती पूर्ण होण्याच्या टप्प्याला अजून पुष्कळ अवकाश आहे. ही मूर्ती घडवण्याची प्राथमिक टप्प्यातील अवस्था आहे. त्यामुळे ‘त्या छायाचित्राकडे पाहून असे वाटते’, असे मला वाटले.
२ ऊ. छायाचित्र क्र. ६
१. छायाचित्राकडे पाहून माझा दीर्घ श्वासोच्छ्वास चालू झाला आणि माझे मन निर्विचार झाले.
२. ‘सूक्ष्मातील गणपति दगडातील गणपतीच्या आकारामध्ये पूर्ण स्थिर आणि एकरूप झाला आहे’, असे मला दिसले.
३. दगडावरील गणपतीचा तोंडवळा पाहून आणि त्याचे मुखावरील अन् डोळयांतील भाव पाहून ‘तो प्रसन्न आहे’, असे मला जाणवले.
४. दगडावरील गणपतीमध्ये मला बाळ श्री गणेशाचे दर्शन झाले. तेव्हा माझ्या मनात ‘मला बालकभावातील गणपतीचे दर्शन का होत आहे ?’, असा विचार आला. तेव्हा मला वाटले, ‘गणपतीच्या मूर्तीला आकार आला आहे; पण ती पूर्ण व्हायची आहे. मूर्तीची जडणघडण चालू आहे. मूर्ती घडवण्याची प्रारंभीची प्रक्रिया चालू असल्यामुळे मला तिच्यात बाल गणपतीचे दर्शन होत आहे.’
५. गणपतीच्या मुखावर लहान मुलाप्रमाणे भाव असून तो आनंदी दिसत होता.
२ ए. छायाचित्र क्र. ७
२ ए १. श्री गणेशमूर्ती गणेशतत्त्वाने भारित झाली असल्यामुळे ती सजीव असल्याचे जाणवणे : आतापर्यंतच्या छायाचित्रांत गणपतीची मूर्ती पाषाणाची वाटत होती; पण आता ती गणपतीची मूर्ती न वाटता ‘तिथे प्रत्यक्ष गणपतीच सगुण रूपात बसला आहे’, असे मला वाटले. मूर्तीतील सर्व अवयवांत सजीवता जाणवली. त्यानंतर मला पुढील सूत्रे जाणवली.
अ. गणपति श्वासोच्छ्वास करत असून त्याची सोंड आणि कान यांची हालचाल होत आहे.
आ. गणपतीच्या हातांतील शस्त्रे पुष्कळ तेजस्वी असून त्यांतून पुष्कळ दैवी तेज वातावरणात पसरत आहे.
इ. गणपतीच्या आयुधांमधून प्रकाशमान शक्ती बाहेर पडत आहे.
ई. देवतांचा देह वायुतत्त्वाने बनलेला असतो. त्यामुळे गणपतीचा देह हलका आहे. परिणामी तो आसनावर बसलेला असूनही थोडासा अधांतरी दिसत आहे.
उ. गणपतीची मूर्ती रंगवलेली नसतांनाही मूर्ती आणि आसन यांत विविध रंग दिसत आहेत.
ऊ. मूर्ती गणेशतत्त्वाने भारित झालेली असल्याने ती अशी दिसत असून तिच्या आजूबाजूला दैवी प्रकाश आहे.
२ ए २. मूर्तीतील चैतन्यामुळे साधिकेच्या मस्तकातील त्रास दूर होत असून तो त्रास मूर्तीत खेचला जात असल्याचे तिला जाणवणे : गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मूर्तीतील चैतन्याचा परिणाम माझ्या डोक्यावर अधिक होत होता. ‘मूर्तीतील चैतन्यामुळे माझ्या मस्तिष्क पोकळीतील त्रास दूर होत असून तो त्रास मूर्तीत खेचला जात आहे. माझ्या मस्तकात मूर्तीतील चैतन्य कार्य करत आहे’, असे मला जाणवले. असे मी पहिल्यांदाच अनुभवत होते.
२ ए ३. ‘सिद्धिविनायकाचे साधकांकडे लक्ष आणि कृपाही आहे’, असे जाणवणे : सिद्धिविनायकाच्या मूर्तीची रामनाथी आश्रमात स्थापना झाल्यावर ‘ती साधकांचे मन आणि बुद्धी यांवरील आवरण नष्ट करत आहे. ती सर्वांच्या बुद्धीवर नियंत्रण ठेवून साधकांना धर्मकार्यात साहाय्य करत आहे. तिचे सगळ्यांवर लक्ष आणि कृपाही आहे’, असे मला जाणवले.
‘सर्वांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी अन् येणार्या आपत्काळात सर्वांकडून धर्मकार्य घडावे’, यांसाठी साहाय्य करावे’, अशी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना !’
(समाप्त)
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (७.५.२०२०)
|