संतांचे (गुरूंचे) आज्ञापालन साधनेत सर्वांत महत्त्वाचे !
स्वतःच्या कृतीतून शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘संतांनी सांगितलेले ऐकले पाहिजे’, असे साधिकेला सांगणे
एका साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘पू. रेखाताईंनी (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) यांनी) मला तुमच्या भेटीसाठी त्यांच्यासमवेत येण्यास सांगितले होते. त्या वेळी मी म्हटले, ‘प.पू. डॉ. मला बोलावतील, तेव्हा मी येईन.’’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तिला म्हणाले, ‘‘पू. रेखाताई संत आहेत. संतांनी सांगितलेले ऐकले पाहिजे. कितीही महत्त्वाची सेवा असू दे, तुझा माझ्याप्रती कितीही भाव असू दे; पण संतांनी सांगितलेलेच ऐकले पाहिजे. त्या सांगतील, तसेच करायचे.’’
२. प.पू. डॉ. आठवले यांचा प.पू. भक्तराज महाराजांचे आज्ञापालन करण्याचा प्रसंग
प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून मला त्यांच्या शिष्यावस्थेतील प्रसंग आठवला. प.पू. गुरुदेव तेव्हा गावोगावी जाऊन अध्यात्मावर अभ्यासवर्ग घ्यायचे. एका अभ्यासवर्गाच्या आदल्या दिवशी प.पू. गुरुदेवांचे सद्गुरु संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी प.पू. गुरुदेवांना दूरभाष करून त्वरित त्यांच्या भेटीला बोलावले. त्यामुळे प.पू. गुरुदेवांनी अभ्यासवर्ग रहित केला आणि ते प.पू. बाबांकडे गेले. तेव्हा प.पू. बाबा प.पू. गुरुदेवांना म्हणाले, ‘‘आजच्या तुमच्या या कृतीतून साधकांना पुष्कळ शिकायला मिळेल.’’
३. गुरूंचे आज्ञापालन करणे साधनेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे !
गुरूंच्या आज्ञापालनाचा आदर्श सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी घालून दिला आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार सनातनचे साधक संत पदावर आरूढ झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आज्ञापालन करणे साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांच्या मार्गदर्शनातून लक्षात आले.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२४)
पैसा नसण्यापेक्षा अधिक दुःख तो कमावण्यासाठी प्रयत्न करतांना जिवाला भोगावे लागणे
‘गेले वर्षभर माझ्या मनात ‘माझ्याकडे पुष्कळ पैसा असावा, मला हवी तशी चैन करता यावी’, असे विचार यायचे. त्यामुळे माझा ओढा व्यावहारिक विषयांमध्ये वाढला होता. त्यासाठी मी बरेच प्रयत्नही केले. हा कालावधी माझ्यासाठी पुष्कळ त्रासदायक ठरला; परंतु भगवंताने मला यातून एक मोलाची शिकवण दिली, ‘पैसा नसल्याने, सुखसोयी नसल्याने जिवाला जेवढे दुःख होते, त्यापेक्षा कैकपटींनी अधिक दुःख पैसा कमावणे आणि त्याचा संचय करणे या गोष्टी करण्यातून होते.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२४)