प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर कोल्हापूर येथे गुन्हा नोंद !
कोल्हापूर – प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर ९ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भात ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्ञानेश महाराव यांनी धोबी/परीट समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून श्री. महेश यादव आणि श्री. राजाराम परीट यांनीही तक्रार दिली आहे.
१. ज्ञानेश महाराव यांनी केलेले वक्तव्य समजल्यावर सर्व हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले आणि ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जमा झाले. प्रारंभी चर्चा झाल्यावर पोलीस निरीक्षकांनी ‘गुन्हा ज्या ठिकाणी घडला आहे, त्याच ठिकाणी तक्रार द्यावी. येथे गुन्हा नोंद होऊ शकणार नाही’, मत मत मांडले.
२. यावरच सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमक भूमिका घेत ‘अभिनेत्री केतकी चितळे हिने कवितेमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नसतांना तिच्यावर अनेक ठिकाणी कसे काय गुन्हे नोंद झाले ? पू. रामगिरी महाराज यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत कसे काय गुन्हे नोंद झाले ? असे प्रश्न उपस्थित करून ज्ञानेश महाराव यांच्या विरोधातही कोल्हापूर येथे गुन्हा नोंद झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली.
३. या प्रसंगी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. उदय भोसले म्हणाले, ‘‘नेहमीच हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या जातात. आतापर्यंत अनेक वेळा आम्ही तक्रारी दिल्या आहेत ! आजपर्यंत दिलेल्या तक्रारींचे पुढे काय झाले ? किती जणांवर गुन्हे नोंद झाले ? अन्य धर्मियांनी दिलेल्या तक्रारींवरून लगेच हिंदूंवर गुन्हे नोंद केले जातात. आम्ही हिंदु आहोत, प्रभु श्रीराम यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आता आम्ही केवळ तक्रार देणार नसून ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाच पाहिजे.’’
४. गुन्हा नोंद झाल्याविना आम्ही पोलीस ठाण्यातून जाणार नाही, अशी ठाम भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी घेतल्यावर अंततः सायंकाळी ५ वाजता पोलिसांना ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा लागला.
५. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. आनंदराव पवळ, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, अधिवक्ता केदार मुनीश्वर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, महाराष्ट्र राज्याचे भाजप सोशल मिडिया संयोजक श्री. प्रकाश गाडे, ‘कोल्हापूर जिल्हा सोशल मिडिया’ समन्वयक श्री. हर्षद कुंभोजकर उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाहिंदूंचे आराध्य प्रभु श्रीराम यांच्या विरोधात आणि स्वामी समर्थ यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणार्या कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! प्रत्येक ठिकाणी हिंदूंनी याप्रकारे एकजूट दाखवल्यास हिंदूविरोधकांना निश्चित चाप बसेल ! |