Lynching : शांततेत रहायचे असेल, तर कुणाचेही ‘मॉब लिंचिंग’ नको ! – इंद्रेशकुमार, रा.स्‍व.संघ

(मॉब लिंचिंग म्‍हणजे जमावाने केलेली हत्‍या)

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे वरिष्‍ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार

पाटलीपुत्र – वेगवेगळ्‍या धर्मातील लोकांना शांततेत रहायचे असेल, तर माणूस किंवा गाय यांपैकी कुणाचेही ‘मॉब लिंचिंग’ होता कामा नये, असे वक्‍तव्‍य राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे वरिष्‍ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार यांनी केले. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी जातनिहाय जनगणनेच्‍या बाजूने व्‍यक्‍त केलेल्‍या मतासमवेत संघ उभा असल्‍याचेही त्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. प.पू. सरसंघचालकांचे मत, हे सर्व संघ स्‍वयंसेवकांचे मत असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.
इंद्रेशकुमार पुढे म्‍हणाले, ‘‘जात हे वास्‍तव आहे. आपण ते नाकारू शकत नाही. त्‍यामुळे जातीचे हे विष अधिकाधिक दूर ठेवण्‍याचा प्रयत्न करायला हवा. अनेक धर्म आहेत आणि असतील; परंतु धार्मिक कट्टरता आणि त्‍यामुळे होणारा हिंसाचार यांपासून आपण सावध राहिले पाहिजे. जगातील अनेक भागांत लोक मांस खातात; पण गायींविषयी लोक संवेदनशील आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्‍याला विविधतेतील एकता साजरी करायला हवी.’’