Ttrain Hits LPG Cylinder : कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडले गॅस सिलिंडर, पेट्रोलची बाटली आणि काड्यापेटी !
|
कानपूर – येथील शवराजपुरा भागातील रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. ८ सप्टेंबला सकाळी ८ वाजता याच रुळावरून भिवानीहून प्रयागराजला जाणार्या कालिंदी एक्सप्रेसने या सिलिंडरला धडक देताच तो रेल्वे रुळाच्या बाजूला फेकला गेला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर कालिंदी एक्सप्रेस जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली.
अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद !
रेल्वे थांबताच रेल्वेचालकाने घटनेची माहिती रेल्वेच्या गार्ड आणि गेटमनला दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. याठिकाणी जवळपास २० मिनिटे गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. घटनास्थळावरून रेल्वे पोलिसांनी सिलिंडर जप्त केले असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी पेट्रोलची बाटली आणि काड्यापेटीही मिळाली आहे. त्यामुळे कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट होता का?, असा पोलिसांना संशय आहे.
३ आठवड्यांतील तिसरी घटना !
गेल्या ३ आठवड्यांतील अशा प्रकारची तिसरी घटना आहे. १६ ऑगस्टला कानपूर झांसी मार्गावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या वेळी साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले होते. या घटनेत काही जण घायाळ झाले होते. यानंतर २३ ऑगस्टला कांसगंज रेल्वेमार्गावर लाकडे ठेवण्यात आली होती. तेव्हाही मोठी दुर्घटना टळली होती. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. त्यांनी दारूच्या नशेत रेल्वे रुळावर लाकडे ठेवल्याची स्वीकृती दिली होती.
संपादकीय भूमिकासरकारने अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे ! |