धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज

महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगर येथे आयोजित धर्मसभेत सहस्रोंचा जनसमुदाय !

कालीचरण महाराज

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – धर्म हे देवाला आपले करण्याचे साधन असून धर्मासाठी प्रत्येक हिंदूने आज एकत्र येण्याची आवश्यकता आहे, प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी केले. ते महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ, तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नुकतेच शहरात भव्य अशा धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते. या सभेचे आयोजन श्रीराम मंदिर चौकात वारकरी संप्रदाय, हिंदु रक्षक कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी शहरातील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते श्रीराम मंदिर चौक असा भव्य मोर्चाही काढण्यात आला होता.

या मोर्च्याला सहस्रोंच्या संख्येने हिंदु बांधव उपस्थित होते. या सभेच्या वेळी शहराला छावणीचे स्वरूप आले होते. सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तासाठी ४५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

या वेळी उपस्थित नवनाथ महाराज म्हस्के म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला होता. विषमता संपवण्यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे.

पुन्हा रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या राजकारण्यांमागे खंबीरपणे उभे रहा !

कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे त्यांना धर्माविषयी काही फारसे माहिती होत नाही. सध्याच्या काळात त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. आता पुन्हा रामराज्य आणण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत अशा राजकारण्यांमागे खंबीरपणे उभे रहा.