पार्थिव सिद्धिविनायक व्रतासंबंधी काही शंकांचे हिंदु धर्मशास्त्रानुसार निराकरण !
गणेशोत्सवाविषयी शंका-समाधान !
१. गणेशोत्सवकाळात अशौच आल्यास काय करावे ?
ज्या मंडळींना गणेशोत्सवाच्या काळात अशौच (सुवेर-सुतक) आहे, त्यांनी गणपतीची स्थापना करू नये अथवा ज्येष्ठा गौरीचे पूजन करू नये. यावर्षी त्याचा लोप करावा (ज्या घरात पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत आचरले जाते आणि त्या घरात यजमान कुटुंबियांना अशौच असेल, तर गौणपक्षाने मार्गशीर्ष, श्रावण किंवा माघ या महिन्यांमध्ये शुक्ल चतुर्थीला पार्थिव सिद्धिविनायकाचे पूजन करावे.)
२. मूर्तीभंग झाल्यास काय करावे ?
गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी जर मूर्तीभंग किंवा प्रतिमेस धक्का पोचला असेल, तर वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करावे. नवीन मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना करावी. घाबरण्याची आवश्यकता नाही किंवा कोणतेही उपाय करण्याची आवश्यकता नाही. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मात्र मूर्ती भंग झाल्यास ‘मूर्तीभंग शांती’ करून घ्यावी. भग्न मूर्तीचे विसर्जन करावे.
२ अ. प्रतिमेची मुख्य ३ अंगे
१. उत्तमांग, म्हणजे मस्तक, शिखाग्र, भाल (ललाट), नाक, कान, डोळे, हात-पाय या अवयवांचा भंग झाला, तर मूर्ती उत्तरपूजन करून लगेच विसर्जित करावी.
२. मध्यमांग, म्हणजे हाता-पायाची बोटे, कानाची पाळी, नासाग्र, मुखाग्र यांचा भंग झाल्यास मूर्ती विसर्जित करावी.
३. ‘हीनांग म्हणजे नखाचे अग्र, अलंकार, माला, आयुधे, प्रभावळ, मुकुट यांना जर लहान तडा गेला, तर प्रतिमा विसर्जन करू नये, त्या भागास लेप द्यावा’, असे ‘वैखानस समूर्तार्चाधिकरण संहिता’ ग्रंथात दिले आहे.
२ आ. चुकून कधी असा प्रसंग उद्भवला, तर न घाबरता काळजीपूर्वक प्रतिमा अवलोकन करावी आणि नंतर ती विसर्जित करावी कि करू नये, याचा निर्णय घ्यावा.
३. कोणती गणेशमूर्ती पुजावी ?
‘इको-फ्रेंडली’च्या नावाखाली कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा, सोने, चांदी, पंचधातू, फळे यांपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचे पूजन करू नये. ‘पार्थिव’ म्हणजे मातीपासून बनवलेला ! चिकणमाती, शाडूची माती, तसेच काही प्रांतात लाल माती वापरूनही गणेशमूर्ती बनवतात. तिचे पूजन करावे.
४. सजावट कशी असावी ?
आपले सर्व सण पर्यावरणपूरक आहेत. कोकणात, विशेषत: सिंधुदुर्ग आणि गोवा प्रांतात आंब्याचे टाळे, रानभाज्या, फुले, रानफळे, सुपारी, आरसे लावून ‘मंडपिका’ (माटवी) सुंदर सजवतात. समई, लामणदिवे यांची रोषणाई पुष्कळ चांगली आहे.
५. पत्री (औषधी वनस्पती)
पत्री वाहिल्याने गणपतीची कृपा होते. गणेशपूजनाच्या अंतर्गत दुर्वा, बेल, शमी, रुई, आघाडा अशा औषधी वनस्पतींना ओळखणे सोपे होते. अनेक जुनी मंडळी आणि आयुर्वेदतज्ञ या वनस्पतींवर आधारित औषधे देतात. प्रवासात संकटाच्या वेळी किंवा ‘ट्रेकिंग’ ला (गड-दुर्गांच्या ठिकाणी) गेल्यावर कुणी आजारी पडले, तर तज्ञ मंडळींच्या सल्ल्याने वनौषधी घेता येतात. या वनस्पतींची ओळख असणे सोपे जाते; म्हणूनच मंगळागौर, हरतालिका, गणपति अशा सर्व व्रतांत विविध पत्री या दोन्ही हेतूंनीच योजल्या आहेत. महिला पत्री काढून निवडणे हे काम कौशल्यपूर्वक करतात. आजीबाईंच्या बटव्यात औषधे असतात. त्यामुळे ‘इको-फ्रेंडली’ची टूम आस्थापनांनी त्यांच्याकडेच ठेवलेली बरी !
६. गणेशमूर्ती कोणत्या रूपात नसावी आणि असावी ?
गणेशमूर्ती चित्रपट अभिनेता, छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजकीय नेते यांच्या रूपात नसावी. मूषक (उंदीर) हे गणेशाचे वाहन आहे. त्यामुळे हत्ती, मोर, बैल किंवा सिंह यांच्यावर बसलेला गणेश अशी मूर्ती सिद्ध करू नये.
‘सिंहासनावर बसलेला एकदंत, शूर्पकर्ण, गजवक्र (हत्तीप्रमाणे मुख असलेला), लंबोदर, हातात पाश, अंकुश, रद म्हणजे (तुटलेला दात) आणि वरदकर (आशीर्वाद देणारा), रक्तवास म्हणजे लाल वस्त्र धारण केलेला, लाल फुलांनी सजवलेला गणपति हवा. नाग यज्ञोपवीतही हवे’, असे काही ग्रंथांत वर्णन केले आहे. त्यामुळे नाचणारा, तबला वाजवणारा किंवा ‘सैराट’ या चित्रपटामधील ‘आर्ची-परशा’च्या रूपातील, बाहुबली, छोटा भीम इत्यादींप्रमाणे गणेशमूर्ती बनवू नये. उगीच कुणीतरी सांगते; म्हणून अयोग्य शास्त्रबाह्य वर्तन करू नये.
७. गणेशमूर्ती पूजनाची सिद्धता कशी करावी ?
आपला दिवस हा ब्राह्ममुहूर्तानंतर चालू होतो. पुरोहित पूजेस येण्यापूर्वी पहाटे लवकर उठावे. उटणे लावून मंगल स्नान करावे. नित्य आन्हिके आटोपून, देवपूजा किंवा पोथीवाचन करून सोवळे उपरणे किंवा धोतर उपरणे नेसावे. देवाला, मोठ्या माणसांना नमस्कार करावा. कपाळास मंगल तिलक लावावा. सनई-चौघडा, मंगल वाद्ये मंद स्वरात लावावे. हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन, शेंदूर, अत्तर, अक्षता वगैरे लहान वाट्यांमध्ये काढून ठेवाव्या. फुले, तुळस, बेल, दूर्वा, पत्री निवडून स्वच्छ करून ताटात काढून ठेवावी. समई, निरांजन तयार करावे. धूप, कापूर काडेपेटीजवळ ठेवावे. गुळखोबरे, मोदक, पेढे लहान भांड्यात काढून ठेवावेत. देवासमोर पानाचा विडा, फळे, नारळ, दक्षिणा ठेवावी. तांब्या, ताम्हण, पळी, पंचपात्रे सर्व भांडी घासून स्वच्छ ठेवावीत. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर) ठेवावे. हे व्रत पार्थिव सिद्धिविनायकाचे आहे. त्यामुळे पार्थिव मूर्तीचीच पूजा करावी. अभिषेकासाठी दुसरी लहान मूर्ती घेऊ नये. २ – २ गणेशमूर्तींचे पूजन करू नये.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.