आश्रमजीवनात विविध प्रसंगांतील समस्यांमधून मार्ग काढण्यास शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. प्रसारकार्यासाठी लागणार्या व्ययाविषयी चिंता व्यक्त केल्यावर प.पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांचा आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन चिंतामुक्त करणे
‘संस्थेच्या आरंभीच्या काळात संस्थेकडे आर्थिक मिळकत, अशी काही नव्हती. अनेक ठिकाणी साधकच यथाशक्ती मासिक अर्पण करत आणि त्यातून संस्थेचे कार्य चालत असे. ‘गुरुपौर्णिमा आणि अभ्यासवर्ग येथे अर्पण देण्यासाठी ठेवलेला खोका अन् ग्रंथांची विक्री’, हे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग होते. साधक पुष्कळ काटकसर करत असत आणि प्रत्येक छोटी वस्तूही अर्पण स्वरूपात मिळवण्याचा प्रयत्न करत असत. त्यातून सनातन संस्थेचे कार्य चालत असे. या पार्श्वभूमीवर ‘नवनवीन उपक्रम, ग्रंथांच्या प्रती छापणे आणि नियतकालिके चालवणे’, यांसाठी किती व्यय होत असेल ?’, याचा विचार करून माझ्या मनावर दडपण यायचे; कारण सेवाकेंद्र अन् आश्रम येथील व्यय मी पहातच होतो.
एकदा प्रसारासाठी काही दुचाकी वाहने विकत घ्यायची होती. मी या व्ययाविषयी प.पू. डॉक्टरांशी बोललो. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) सांगायचे, ‘‘बाकीचे सगळे अंथरूण पाहून पाय पसरतात; पण आपण कार्य करणार आहोत, तर पाय पसरावेत. देव अंथरूण देईल’, अशी श्रद्धा ठेवावी. मग आपोआप मिळेलच !’’
२. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर आलेल्या अडचणी सोडवतांना ‘परिस्थितीमुळे शक्य नाही’, या मानसिकतेत न रहाता देवावर श्रद्धा ठेवण्यास शिकवणे !
अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर एक वर्षानंतर ‘त्याचे वितरण चांगले असायला हवे. ते वाढते रहायला हवे’, असे मला वाटत असे; पण त्याच वेळी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आध्यात्मिक दृष्टीकोनावर आधारित दैनिक आहे, तर त्यामध्ये लिखाणही योग्य असायला हवा’, असेही मला वाटत असे.
आ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन पूर्ण होणे’, हीच एक मोठी समस्या होती. त्यामुळे आर्थिक गोष्टींचा विचार करायला मला फारसा वेळही मिळत नसे. त्यामुळे ‘आपण जेवढे करत आहोत, ते पुष्कळ आहे’, अशी माझी समजूत झाली होती.
इ. कधीतरी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे समाज परिवर्तनासाठी आहे आणि समाजपरिवर्तन होत नसेल, साधकांना साधना समजत नसेल, ते साधनेमध्ये पुढे जात नसतील, तर या खटाटोपाचा काय उपयोग ?’, असाही प्रश्न माझ्या मनात येत असे.
वरील अडचणींविषयी प.पू. डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’चा वापर या कामासाठी केवळ १५ टक्के, इतकाच करत आहात.’’ त्यामुळे ‘काही करायचे, तर ‘परिस्थितीमुळे शक्य नाही’, या मानसिकतेतून आपण मोकळे व्हायला हवे’, हे मला समजले.
३. चौकटीबाहेर जाऊन विचार करायला आणि तो स्वीकारायला शिकवणे
‘आश्रमात रहाणे’, हे मला आणि माझ्या समवेत असणार्या अनेकांसाठी पूर्णतः नवीन होते अन् ‘नेमके काय योग्य ? काय अयोग्य ? नेमके कसे असायला हवे ? कोणत्या अडचणी येतात ? कोणत्या गोष्टी कुणाला त्रासदायक ठरतात ? कोणत्या गोष्टी सुधारण्यावर भर द्यायला हवा ? कोणत्या गोष्टी कोणत्या पद्धतीने सुधारायला हव्यात ?’, याविषयी मी शिकत होतो. चुकांचा फलक, स्वयंसूचना इत्यादी गोष्टी तेव्हा नव्हत्या. त्यामुळे माझी समस्या सोडवण्याची आणि त्यासंबंधी विचार करण्याची पद्धत विशिष्ट चौकटीत बद्ध असायची. काही वेळा समस्या लगेच सुटत नसत. अशा वेळी ‘चौकटीबाहेर जाऊन विचार करायला हवा आणि तो थोडासा कठीण वाटला, तरी स्वीकारायला हवा’, अशी माझी मानसिकता नव्हती; मात्र पुढील प्रसंगांतून ही मानसिकता पालटायला साहाय्य झाले.
३ अ. प्रसंग क्र. १ – प.पू. डॉक्टरांनी ‘सुखसागर’ आश्रमातील स्नानगृहातील बालद्या एका जागी रहात नसल्याने त्या साखळीने स्नानगृहातील तोटीला बांधायला सांगणे : फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ आश्रमात ३ स्नानगृहे होती आणि कपडे धुण्याची व्यवस्था बाहेर थोडी दूरवर होती. बालद्या स्नानगृहात असत. सर्व नवीनच असल्यामुळे ‘स्नानासाठी आणि कपडे धुण्यासाठी वेगळ्या बालद्या असतात’, हा भेद काही जणांच्या लक्षात येत नसे. बालद्यांचा रंग पालटला, आकार पालटला, त्यावर लिखाण केले, तरी ‘एका स्नानगृहातील बालदी दुसर्या स्नानगृहात जाणे किंवा पहिल्या स्नानगृहात बालदीच नसणे’, असा गोंधळ व्हायचा. विविध उपाय करूनही हे प्रकार काही थांबेनात; म्हणून मी ही अडचण प.पू. डॉक्टरांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘बालद्यांना साखळ्या लावा आणि त्या साखळ्या त्या त्या स्नानगृहातील नळाच्या तोटीला बांधून टाका, म्हणजे त्या स्नानगृहातील बालदी त्याच स्नानगृहात राहील.’’ ही उपाययोजना माझ्यासाठी पूर्णपणे चौकटीबाहेरची होती.
३ आ. प्रसंग क्र. २
३ आ १. अनेकदा दुपारचा महाप्रसाद बनवायला विलंब होणे आणि त्यावर दीर्घकाळ उपाययोजना काढता न येणे : ‘सुखसागर’ येथे असतांना स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधिकांचा एक वेगळा गट होता. त्या साधिका किंवा तेथे सेवा करणारे साधक स्वयंपाकघरातील सर्व सेवा करत असत. ‘अल्पाहार आणि जेवण बनवणे, भाज्या चिरणे’ इत्यादी सर्वच सेवा ते साधक पहात असत. त्यामुळे कधीकधी दुपारच्या महाप्रसादाला विलंब होत असे. ‘विलंब का झाला ?’, हे पहायला गेलो, तर कोणते ना कोणते कारण पुढे यायचे. त्या कारणासाठी उपाय केला, तर नवीन कारण घडून सर्व नियोजन कोलमडून जात असे.
३ आ २.‘अल्पाहार बनवणारे आणि भोजन बनवणारे’, असे साधकांचे दोन स्वतंत्र गट करून कार्यवाही चालू केल्यानंतर समस्या सुटण्यास साहाय्य होणे : कालांतराने लक्षात आले, ‘अल्पाहाराला विलंब झाल्यामुळे नंतर सर्व आवरायला विलंब होतो. त्यामुळे महाप्रसादाला विलंब होतो.’ कधी महाप्रसाद बनवतांना काही अडचणी आल्या; म्हणून आणखी विलंब झाला, असा या ना त्या कारणाने विलंब होत असे. त्यासाठी काही प्रयत्न केले, तरी फार सुधारणा होत नव्हती. मग असे काही आठवडे गेल्यानंतर लक्षात आले, ‘स्वयंपाक करणार्या साधकांचा गट एकच असल्याने त्यांच्या शारीरिक मर्यादाही येतात.’ हे सर्व पाहून माझ्या मनात विचार आला, ‘आपण अल्पाहार बनवणारे आणि महाप्रसाद बनवणारे, असे साधकांचे वेगवेगळे गट केले, तर अल्पाहार अन् महाप्रसाद या सेवा आपापल्या गतीने वेळेवर चालू होतील आणि वेळेवर संपतील. (आधी अल्पाहाराची सेवा आटोपायला विलंब झाल्यामुळे महाप्रसादाची सेवा विलंबाने चालू होत असे आणि रात्री महाप्रसादाची सेवा आटोपायला विलंब झाला; म्हणून बाहेरचे आवरणे इत्यादी सेवा विलंबाने चालू होत असत.) त्यानंतर ‘अन्यत्र सेवा करणार्या साधकांनी अल्पाहाराची सेवा करावी आणि स्वयंपाकघरातील साधकांनी महाप्रसाद बनवण्याची सेवा करावी’, असे ठरले.
३ आ ३. ‘सर्व सुरळीत होत आहे’, असे वाटून मी हे प.पू. डॉक्टरांना सांगितले. माझ्या मनात होते, ‘ते म्हणतील, ‘छान झाले.’ प्रत्यक्षात ते म्हणाले, ‘‘ही उपाययोजना सुचायला इतके दिवस का लागले ?’’
३ आ ४. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. वरील प्रसंगात मला माझा कर्तेपणा लक्षात आला.
आ. ‘त्या त्या विभागातील साधकांनी तेथील सर्व सेवा करावी, म्हणजेच ‘स्वयंपाकघरातील साधकांनी तेथील सर्व सेवा करावी’, अशी माझी संकुचित मानसिकता होती.
इ. समस्येचा खोलवर अभ्यास करून वाटल्यास चौकटीबाहेरची उपायोजना काढायला हवी.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२४)