हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशियांची सद्यःस्थिती, अथर्ववेद, ऋग्वेद आणि स्कंद पुराण यांतील गोमाहात्म्य, गायीच्या शरिरात सर्व देवतांचे वास्तव्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य, गायीच्या शेणाचे महत्त्व, गायीच्या दुधाचे विविध उपयोग आणि गायी-म्हशीच्या दुधांतील भेद’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ४८)
लेखांक क्र. ४७ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831933.html
१५. नकली तूप आणि गायीचा अनादर !
वनस्पती तूप नावाचा पदार्थ बाजारात विकत मिळतो. त्यात तूप मुळीच नसते. तेलात अनेक द्रव्ये अशी घालतात की, ज्यामुळे ते तुपासारखे थिजते आणि पांढरे अन् घट्ट दिसते. आचार्य विनोबाजींनी ‘नकली तूप कायद्याने बंद करावे’, असे म्हटले होते. ‘अशा तुपापेक्षा सरळ शुद्ध तेल खावे’, असे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे मत होते.
मनुष्याच्या शरिराचे उष्णतामान ३७ अंश सेल्सिअस असते. वनस्पती तुपाचे वितळण्याचे तापमान ४५ अंश सेंटिग्रेड असते. शुद्ध तूप थंडीच्या दिवसांत गोठते; पण ते हातावर घेतले, तर शरिराच्या उष्णतामानाने विरघळते. उलट वनस्पती तूप उन्हाळ्यातही घट्ट असते आणि शरिराच्या उष्णतामानानेही विरघळत नाही. त्यामुळे त्या तुपात बनवलेल्या पदार्थांतील तूप शरिरात गेल्यावर शरिराच्या उष्णतामानात पुन्हा गोठू लागते आणि आतड्यांना आतून चिकटून बसते. त्यामुळे ते पचतही नाही आणि सहजासहजी जागचे हलतही नाही. आरोग्याला ते अत्यंत घातक आहे, तसेच त्यात ‘गायीची चरबी मिसळतात’, असे म्हणतात.
परदेशात गाय हा केवळ उपयुक्त पशू असल्यामुळे आणि तिच्याकडे भारताप्रमाणे आदराने बघत नसल्याने तिच्या हाडांची पावडर नामवंत टूथपेस्टमध्ये उपयोगात आणतात. गोमाता म्हणून गोग्रास घालणारे आम्ही प्रतिदिन सकाळी हा टूथपेस्टचा ‘गोग्रास’ आमच्या मुखात खुशाल घालतो. गोपूजन करणार्या समाजाने या टूथपेस्टवर बहिष्कार घातला पाहिजे.
१६. परदेशाला मांस निर्यात करणारा ‘भारत’ हा एकमेव देश !
इंग्रजांना गायीचे मांस खायचे असल्यामुळे त्यांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गोमांस निर्यात चालवली होती; परंतु स्वातंत्र्यानंतर अजूनही ती नियमितपणे मोठ्या प्रमाणात चालूच आहे. असे म्हणतात, ‘परदेशाला मांस निर्यात करणारा भारत हा एकमेव देश आहे.’ आता तर अरब देशांतील श्रीमंत मुसलमान हे या गोमांसाचे मोठे गिर्हाईक आहेत आणि आपण दरिद्री आहोत.
१७. गोवंश बिघडवण्यामागील दुष्ट प्रक्रिया !
काय दुर्दैव आहे पहा ! गायीला आई मानणारे तिला कापून तिचे मांस गोभक्षकांना पुरवत आहेत. इंग्लंडमध्ये गायींचे मांस भरपूर वाढावे; म्हणून गायींच्या फार्मवर (Cattle farm) असणार्या गायींना, गायीच्या हाडांची पूड आणि मांसजन्य पदार्थ अन्य खाद्यपदार्थांत मिसळून खाऊ घालण्यात आले. त्याचा परिणाम ते अन्न खाणार्या गायीच्या दुधावर झाला आणि त्यात एक प्रकारचे विष उत्पन्न झाले. त्याचा परिणाम ते दूध पिणार्यांवर भयानक प्रमाणात होऊ लागला. ‘इतका बिघडलेला गोवंश कसा सुधारावा’, ही समस्या आज त्यांच्यापुढे आहे. अशा गायींना तिकडे ‘मॅड काऊज’ (Mad Cows) म्हणतात.
१८. न्यूझीलंड गोदूध उत्पादनात पुढे !
गायीच्या दुधाच्या उत्पादनाचे प्रमाण न्यूझीलंडमध्ये सर्वांत अधिक आहे. त्या खालोखाल डेन्मार्क, फिनलँड, स्वीडन, यू.एस्.ए. (अमेरिका), इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि सर्वांत खाली भारताचा क्रमांक लागतो.
१९. गोभक्ती, गोरक्षण आणि गोसंवर्धन यांचे महत्त्व
गोरक्षण आणि गोसंवर्धन हे अग्रक्रमाने भारतात व्हायला हवे. ही भगवान श्रीकृष्णाची पवित्र भूमी आहे. श्रीकृष्ण स्वतःला ‘गोविंद’, ‘गोपाळ’ या पदव्यांनी ओळखत असत. ‘गोविंदापतये नमः ।’ असे विष्णुसहस्रनामांत म्हटले आहे. गोविंद म्हणजे गायीचे शास्त्र जाणणारे, त्यांच्यात जो श्रेष्ठ, तो गोविंदापती होय. त्या श्रीकृष्णाच्या या भूमीला गोवध हा कलंक आहे. ‘गोभक्ती मुख्य लक्षण हिंदूंचे, मानबिंदू गो त्यांचा ।’, असे एका कवीने म्हटले आहे. श्रीकृष्ण यादव होते. ते गायीचे दूध आणि लोणी खात होते. (आताचे काही यादव म्हणे ‘चारा’ खातात.)
२०. ‘गाय’ हा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करावा !
गोपालन हा राष्ट्रीय कार्यक्रम करावा. गाय हा राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावा. गायींचे भारतातील श्रेष्ठ वंश संकर न करता ते शुद्धपणे वाढवावेत. अमेरिकेत भारतातील उत्तम गायी आणि वळू नेले आहेत. त्यांवर त्यांचे प्रयोग चालू आहेत. या गायींना तिकडे ‘ब्राह्मण गाय’ (Brahmin Cows) म्हणतात. या गायींचा स्वभाव, वर्तणूक, बुद्धी, तसेच त्यांच्या दुधातील गुणधर्म इत्यादीत त्यांना तिकडच्या गायींपेक्षा पुष्कळ भेद आढळून आला आहे. (क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक क्र. ४९ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833184.html