रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापन झालेली सिद्धिविनायकाची मूर्ती घडत असतांनाच्या प्रत्येक टप्प्यातील छायाचित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘सनातनच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी बळ मिळावे’, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सिद्धिविनायकाच्या मूर्तीची स्थापना करावी’, असे महर्षींनी सांगितले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (आताचे पू. (कै.) नंदा आचारी) यांनी दगडाची सिद्धिविनायकाची मूर्ती बनवली. त्यांनी ती मूर्ती कारवार येथे घडवली. नंतर तिची रामनाथी आश्रमाच्या परिसरात स्थापना करण्यात आली. ही मूर्ती घडत असतांना तिची विविध टप्प्यांवरील छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांचे रामनाथी आश्रमातील साधिका सौ. रंजना गौतम गडेकर यांनी सूक्ष्म परीक्षण केले. ते पुढे दिले आहे. (भाग १)
१. रामनाथी आश्रमासाठी सिद्धिविनायकाची मूर्ती बनवण्यासाठी निवडलेल्या दगडाविषयी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
१ अ. आसमंतातून लाल वस्त्रात गुंडाळलेली एक वस्तू पृथ्वीवर येतांना दिसून ती एका दगडात विलीन होणे आणि ‘सिद्धिविनायकाची मूर्ती बनवण्यासाठी त्या दगडाची निवड झाली’, असे जाणवणे : ‘७.५.२०२० या दिवशी मला सूक्ष्मातून लाल वस्त्रात गुंडाळलेली एक वस्तू आसमंतातून खाली येतांना दिसली. त्या वस्तूतून सोनेरी किरण वातावरणात प्रक्षेपित होत होते. ती वस्तू खाली येऊन पृथ्वीवरील एका दगडात विलीन झाली. तेव्हा ‘प्रत्यक्ष गणपति त्या दगडात स्थित झाला असून तो दगडाच्या रूपानेच या पृथ्वीवर अवतरित झाला आहे आणि रामनाथी आश्रमातील सििद्धविनायकाची मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांकडून त्याच दगडाची निवड झाली आहे’, असे मला जाणवले.
१ आ. देवता पृथ्वीवर अवतरित होतांनाची प्रक्रिया : एखाद्या अवतारी जिवाला पृथ्वीवर कार्य करायचे असल्यास तो उच्च लोकातून पृथ्वीवर अवतरित होतो, उदा. सीतामाता. सीतामाता राजा जनकाला भूमी नांगरतांना सापडली. सीतामाता म्हणजे हिरण्यगर्भ लहरींचे सगुण साकार रूप ! भूमीतून हिरण्यगर्भ लहरी उत्पन होतात. हिरण्यगर्भ लहरी या प्रजननक्षमतेच्या द्योतक आहेत. त्यांच्या सगुण साकार रूपाचे प्रतीक म्हणजे सीतामाता ! प्रत्यक्षातही सीतामाता देवलोकातून आकाशमार्गे पृथ्वीवर आली आणि बालिकेच्या रूपात अवतरित झाली. राजा जनकाला ती शेत नांगरतांना एका पेटीत प्राप्त झाली. देवता पृथ्वीवर अवतरित होतांनाची ही एक प्रक्रिया आहे. ही सर्व दैवी लीलाच आहे.
त्याचप्रमाणे ‘रामनाथी आश्रमातील गणपतीच्या मूर्तीसाठी निवडलेल्या दगडातही प्रत्यक्ष सिद्धिविनायकाचेच प्रगटीकरण झाले आहे’, असे मला जाणवले.
१ इ. दगडात निर्गुण गणपतितत्त्व कार्यरत होणे : मूर्ती बनवण्यासाठी दगडाची निवड झाल्यावर त्या दगडात निर्गुण ईश्वरी तत्त्वाचा झोत पांढर्या रंगाच्या रूपात दगडाच्या मध्यभागी येतांना दिसला आणि ईश्वरी संकल्पानुसार त्यात निर्गुण गणपतितत्त्व संक्रमित होण्याची प्रक्रिया होण्यास आरंभ झाला. त्या दगडाकडे पाहून माझा ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप होऊ लागला. त्या वेळी ‘त्या दगडात निर्गुण गणपतितत्त्व कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.
१ ई. ‘गणपतीचे निर्गुण तत्त्व दगडात संक्रमित होऊन त्या दगडाची शुद्धी होत आहे’, असे जाणवणे : जेव्हा एखाद्या अवतारी तत्त्वाला मनुष्यदेह धारण करायचा असतो, तेव्हा ते अवतारी तत्त्व स्त्रीच्या बिजात प्रवेश करण्यापूर्वी दैवी शक्तीचे प्रक्षेपण करून त्या स्त्रीच्या गर्भाचे शुद्धीकरण करते आणि स्त्रीचा गर्भ शुद्ध अन् सात्त्विक बनवते. त्यानंतर अवतार त्या स्त्रीच्या गर्भात स्थान प्राप्त करतो. त्याप्रमाणे ‘गणपति त्याच्या निर्गुण तत्त्वाने दगडाचे शुद्धीकरण करून तो दगड दैवी ऊर्जेने भारित करत आहे’, असे मला जाणवले.
२. सिद्धिविनायकाची मूर्ती बनवतांना वेगवेगळ्या टप्प्यात काढलेल्या छायाचित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण आणि आलेल्या अनुभूती
२ अ. छायाचित्र क्रमांक १
२ अ १. आलेली अनुभूती : श्री सिद्धिविनायकाची मूर्ती ज्या दगडातून घडवली जाणार होती, त्या दगडाकडे पाहिल्यावर माझा ‘ॐ गँ गणपतये नम:। हा नामजप होऊ लागला.
२ अ २. सूक्ष्म परीक्षण
अ. त्या दगडात मला गरुडदेवतेचे दर्शन झाले. गरुडदेवता पंख पसरून उड्डाण करत असून ‘गरुडावर भगवान विष्णु बसला आहे’, असे मला दिसले. मला भगवान विष्णूच्या जागी क्षणभर नरसिंहाचे मुख दिसले.
आ. मला भगवान विष्णूच्या चरणांजवळ हातात लहान बाळाला घेऊन बसलेली एक स्त्री दिसली. मला त्या बाळाचा चेहरा बाल गणपतीप्रमाणे दिसला. तेव्हा ‘ती स्त्री म्हणजे बाळ गणपतीला घेऊन बसलेली पार्वतीदेवीच आहे आणि भगवान विष्णु पार्वतीदेवीसह बाळ गणपतीला घेऊन रामनाथी आश्रमात येत आहे’, असे मला जाणवले.
इ. मला गरुडाच्या आजूबाजूला लहान लहान मुखमंडले दिसत हाेती. त्यांतूनही चांगली स्पंदने येत होती. ‘ती विविध देवतांची मुखमंडले असून त्या देवता बाळ गणपतीकडे पहात आहेत’, असे मला जाणवले.
ई. गरुडाच्या मुखाच्या वरच्या रेषेत पर्वताची एक रांग दिसली. ती कैलास पर्वताच्या रांगेप्रमाणे दिसत होती. ‘त्या पर्वतांमध्ये कैलास पर्वत आहे’, असे मला जाणवले.
उ. एकदा मला भगवान विष्णूच्या जागी एक देवी दिसली. ‘तिने एका बाळाला कडेवर घेतले आहे आणि ती गरुडावर आरूढ होऊन कुठेतरी जाण्यास निघाली आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला वाटले, ‘सिद्धिविनायकाला भगवान विष्णूनेच आपले वाहन असलेला गरुड कैलास पर्वतावरून आणण्यासाठी पाठवले आहे.’
ऊ. एकदा ‘भगवान विष्णूच्या जागी प्रत्यक्ष गणपतीच गरुडावर बसला असून त्याच्या चरणांशी ऋद्धि-सिद्धि बसल्या आहेत’, असे मला जाणवले. गरुडाच्या मागे दिसणार्या पर्वतरांगाही उड्डाण करत आहेत’, असे मला दिसले.
ए. मला ‘कैलास पर्वतावरील पर्वतरांगा आणि देवतांची मुखमंडले दिसली’, याचा अर्थ ‘केवळ गणपतीच येत आहे’, असे नसून ‘कैलास पर्वताच्या आजूबाजूला असलेल्या पर्वतांवर वास्तव्य करत असलेल्या देवता अन् ऋषिमुनीही रामनाथी आश्रमाच्या दिशेने येत आहेत’, असे वाटले.
ऐ. ‘गणपतीसह त्याचे गणही आले आहेत’, असे मला जाणवले.
‘ज्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, त्याप्रमाणेच सूक्ष्मातून ही प्रक्रिया होत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०२०) (क्रमशः)
|