Ranchi Police : लालपूर (झारखंड) येथे पोलीस ठाण्‍यातच २ तरुणांकडून पोलिसांना मारहाण !

तरुणांनी केली पोलिसांना मारहाण

रांची (झारखंड) – येथील लालपूर पोलीस ठाण्‍यात २ तरुणांनी पोलिसांना (Police) मारहाण केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्‍याने, ‘पोलिसांविषयीचा धाक समाजात राहिला आहे कि नाही’, असा प्रश्‍न केला जात आहे. व्‍हिडिओत हे तरुण एका पोलिसाला भिंतीकडे जोरात लोटतांना दिसत आहेत. घटना ६ सप्‍टेंबरच्‍या रात्री उशिरा घडल्‍याचे सांगितले जात आहे.

१. रात्री १ वाजण्‍याच्‍या सुमारास पांढर्‍या रंगाच्‍या एका चारचाकीतून रवी रंजन लाक्रा आणि विनोद लाक्रा नावाचे २ तरुण भरधाव वेगाने जात होते.

२. लालपूर चौकात येताच गस्‍तीवर असलेल्‍या पोलिसांनी त्‍यांना थांबवले. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडे कागदपत्रांची मागणी केली.

३. या वेळी दोघांनी पोलिसांशी अर्वाच्‍य भाषेत शिवीगाळ केली आणि आम्‍ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ता असल्‍याचे सांगितले. तसेच ‘आम्‍ही तुमचा गणवेश २ मिनिटांत उतरवू शकतो’, अशी धमकीही दिली.

४. यानंतर पोलिसांनी दोघांना कह्यात घेऊन पोलीस ठाण्‍यात नेले. दोघांनी तेथेही वाद घातला आणि तेथील काही कागदपत्रेही फाडली. त्‍यानंतर पोलिसांनाच मारहाणही केली. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाला आहे.

५. यामुळे पोलिसांनी दोघांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करून त्‍यांना अटक केली आहे. यानंतर समोर आले की, ते कोणत्‍याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून खोटे बोलत होते.

संपादकीय भूमिका

समाजात पोलिसांचा धाक कशा प्रकारे अल्‍प होत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! यासाठी पोलीस खात्‍यातील भ्रष्‍टाचारच एकप्रकारे कारणीभूत आहे. पोलीस कसोशीने वागले असते, तर समाजात त्‍यांच्‍याविषयी भीतीयुक्‍त आदर आणि धाक आपोआप निर्माण झाला असता, हेच खरे !