देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करून पावित्र्य जपणे महत्त्वाचे !
(टीप : वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
हिंदु मंदिरे ही हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत, हिंदु धर्माचा पाया आहे, आमची संस्कृती आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या हिंदु देवस्थाने राखून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य राजे-महाराजे करत होते. देवस्थानांच्या माध्यमातूनच सनातन हिंदु धर्माचे संरक्षण होत असे. देवस्थानांच्या माध्यमातून कला, शिक्षण, न्याय समाजाला दिले जात असल्याने देवस्थानेच हिंदु धर्माची केंद्रबिंदू होती. आज मात्र ही देवस्थाने धर्माचा केंद्रबिंदू न रहाता पर्यटनस्थळ बनत चालली आहेत.
१. वस्त्रसंहितेला देवस्थानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि अधिक सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी देवस्थानात येणार्या भक्तांनी वस्त्रसंहितेचे पालन केले पाहिजे. देवस्थानांनी आपल्या देवस्थानात वस्त्रसंहितेचे फलक लावले पाहिजेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर मंदिर अधिवेशने पार पडली. या अधिवेशनांच्या माध्यमातून वस्त्रसंहिता अभियानाला आणखी गती मिळाली. मंदिर महासंघाच्या वतीने वस्त्रसंहितेचे ‘फलक’ करून सर्व देवस्थानांना देण्यात आले. परिणामी गेल्या ६ मासांच्या कालावधीत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे एकूण ६७५ देवस्थानांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हे सर्व केवळ हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांचे फळ आहे. यामध्ये आद्यशंकराचार्यांनी कर्नाटकमध्ये स्थापन केलेले शृंगेरी शारदा पिठ, सुप्रसिद्ध श्री क्षेत्र हंपी विरुपाक्ष मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, उज्जैन येथील महाकालेश्वर देवस्थान, महाराष्ट्रातील ६ वे ज्योतिर्लिंग असलेले श्री भीमाशंकर देवस्थान, अष्टविनायकाची देवस्थाने, अशा देवस्थानांचा समावेश आहे. महेश्वरी समाजाच्या मंदिरांनीही स्वयंप्रेरणेने वस्त्रसंहिता लागू केली आहे. अयोध्येतील श्रीराममंदिरातही आता वस्त्रसंहिता लागू करण्याचा विचार होत आहे. वस्त्रसंहितेचे अभियान आरंभल्यानंतर त्याला देवस्थानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील पुणे येथे एकाच दिवशी ७१ मंदिरांमध्ये, रत्नागिरी येथे एकाच दिवशी ५१ देवस्थानांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली.
२. वस्त्रसंहिता अभियानातील महत्त्वाचे घटक
या अभियानात ६ घटकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे – देवस्थानाचे विश्वस्त, देवस्थानचे पुजारी आणि पुरोहित, भक्त, स्थानिक लोक, प्रसिद्धीमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे ! हे ६ घटक जर एकत्र आले, तर केवळ ७०० – ८०० नव्हे, तर सहस्रो देवस्थानांमध्ये आणि केवळ भारतातच नव्हे, तर विश्वभरातील सर्व देवस्थानांमध्ये वस्त्रसंहिता लागू होऊ शकते.
या अभियानाच्या माध्यमातून केवळ वस्त्रसंहिता लागू करणे, एवढेच नव्हे, तर भ्रमणभाष, ‘सेल्फी’ (स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) यांवर प्रतिबंध घालणे, मद्य-मांस याला १०० मीटर परिसरात बंदी घालणे, असे प्रयत्नही अनेक देवस्थाने करत आहेत. विशेष म्हणजे ९९ टक्के माध्यमे या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. माध्यम क्षेत्रातील पत्रकारांनी समाजात वस्त्रसंहितेच्या बाजूने आणि विरोधात सर्वेक्षण केल्यावर हिंदूंच्या मुखातून एकच उत्तर आले, ते म्हणजे – ‘वस्त्रसंहिता, आमची संस्कृती, आमचा धर्म ! हे अवश्य झाले पाहिजे.’
३. वस्त्रसंहितेला विरोध करणारे घटक
असे असले, तरी काही धर्मविरोधी, पाखंडी शक्ती वस्त्रसंहितेला विरोध करत आहेत.
३ अ. समाजातील साम्यवाद्यांची इकोसिस्टीम (यंत्रणा) : साम्यवादी विचार असलेले (बुद्धीवादी) वस्त्रसंहितेला विरोध करत आहेत. अनावश्यक मते आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काही जण विरोध करत आहेत. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांची मोडतोड करता येणार नाही. समाजात वावरतांना समाजाच्या अभिव्यक्तीप्रमाणे चालले पाहिजे.
३ आ. हिंदुविरोधी शासनकर्ते : काही हिंदुविरोधी शासनकर्ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठी वस्त्रसंहितेच्या विरुद्ध मतप्रदर्शन करत आहेत. कर्नाटकात संपूर्ण राज्यात वस्त्रसंहितेच्या संदर्भात चर्चेला प्रारंभ झाल्यावर कर्नाटकचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हे स्वीकारार्ह नाही’, असे वक्तव्य केले होते. ‘विशिष्ट ‘ड्रेसकोड’पेक्षाही (वस्त्रसंहितेपेक्षाही) भक्ती महत्त्वाची आहे’, असे वक्तव्य केले होते. भाविकांनी मात्र वस्त्रसंहितेचे सूत्र उचलून धरून आणि त्या कालावधीत अधिकाधिक देवस्थानांनी त्यांच्या देवस्थानांमध्ये वस्त्रसंहितेचे फलक लावून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेला योग्य उत्तर दिले. यावरून वस्त्रसंहितेविषयी किती मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे, हे लक्षात येते.
४. वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?
आपल्यालाही आपल्या क्षेत्रातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करायची असेल, तर
४ अ. देवस्थानांशी संबंधित सर्व विश्वस्तांना एकत्र करून त्यांची बैठक घेऊन तिथे वस्त्रसंहितेचा ठराव संमत करावा.
४ आ. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या आधी ४ दिवस त्याविषयीची घोषणा करण्यात यावी. वस्त्रसंहितेचा निर्णय समाजापर्यंत पोचवण्यासाठी ‘प्रेस नोट’ काढावी किंवा पत्रकार परिषद घ्यावी.
४ इ. याविषयी माहिती नसतांना देवस्थानात कुणी भाविक आल्यावर कोणतीही अडचणी येऊ नये; म्हणून देवस्थानांमध्ये पुरुषांसाठी धोतर आणि महिलांसाठी साडी उपलब्ध करून देण्यात यावी.
५. आवाहन
या लेखाच्या माध्यमातून आवाहन करतो की,
५ अ. सर्व विश्वस्तांनी आपापल्या देवस्थानांमध्ये वस्त्रसंहितेचे फलक अवश्य लावावेत.
५ आ. इतर देवस्थानांमध्येही वस्त्रसंहितेचे फलक लावण्यास सांगून या अभियानात सहभागी व्हावे.
५ इ. केवळ खासगी देवस्थानातच नव्हे, तर सरकारीकरण झालेल्या देवस्थानांमध्येही वस्त्रसंहिता लागू झाली पाहिजे. त्यासाठी संबंधित सर्व क्षेत्रांतील अधिकार्यांना निवेदन देण्यासाठी सर्व भक्तांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. ‘देवस्थान रक्षण हेच धर्मरक्षण आहे’, हे लक्षात घेऊन त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
– श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
वस्त्रसंहितेच्या संदर्भात चुकीचे ‘नॅरेटिव्हज्’ (कथानके) आणि योग्य दृष्टीकोन
वस्त्रसंहितेचे अभियान राबवतांना समाजात याविषयी काही चुकीचे ‘नॅरेटिव्हज्’ पसरवले गेले असल्याचे लक्षात आले.
अ. कोणती वस्त्रे घालायची हा त्या व्यक्तीचा निर्णय ! : ‘आम्ही कोणतीही वस्त्रे घालू, ती आमची इच्छा. त्याविषयी कुणीही विचारू नये’, असे काही जण म्हणतात; पण ते मशिदीत जाणार्यांना ‘टोपी का घालता ?’, म्हणून विचारत नाहीत. ‘खरे तर वस्त्रसंहिता ही समाजाच्या दृष्टीने काही नवीन संकल्पना नाही. पोलीस, अधिवक्ता, विद्यार्थी यांना त्यांचा गणवेश असतो. ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये (शस्त्रकर्मगृहात) जातांना डॉक्टरही विशिष्ट प्रकारचा पोशाख घालतात. एवढेच नव्हे, तर कारागृहात गुन्हेगारांनाही वस्त्रसंहिता आहे, मग मंदिरात का नाही ?’, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे.
आ. वस्त्रसंहिता म्हणजे काहीतरी जुनी-पुराणे आहे ! : असे काही जण म्हणतात; पण प्रत्यक्षात वस्त्रसंहिता ही जुनी-पुराणे नाही, तर देवदर्शनाचा आध्यात्मिक लाभ मिळवून देणारी गोष्ट आहे. जसे एखाद्या बँकेत अधिक व्याजदर असेल, तर तिथे पैसे गुंतवले जातात, मग ज्या पोशाखामुळे आध्यात्मिक स्तरावर देवदर्शनाचा अधिक लाभ होतो, तेथे तशा प्रकारचे वस्त्र परिधान करण्यास विरोध का ? आज विदेशी लोक भारतीयत्वाकडे, हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. असे असतांना आपल्याला पारंपरिक वस्त्रांची हेटाळणी करणे, म्हणजे आपल्याकडच्या हिर्याला कोळसा म्हणण्यासारखे आहे.
इ. वस्त्रांपेक्षा भक्ती महत्त्वाची ! : काही जण म्हणतात, ‘वस्त्रांपेक्षा भक्ती महत्त्वाची !’ असे वक्तव्य करणारे कुणी श्रद्धाळू नाहीत, तर नास्तिकतावादी आहेत. ते हिंदूंना डोस पाजतात की, वस्त्रांपेक्षा भक्ती महत्त्वाची आहे. भक्ती भक्तीच्या ठिकाणी आहेच; पण देवदर्शन हे कर्मही असल्याने कर्मयाेगानुसार ते योग्य पद्धतीने करणेही महत्त्वाचे आहे. ते धर्माला अनुकूल पद्धतीने केले जायला हवे.
ई. वस्त्रसंहिता असेल, तर युवा वर्ग मंदिरात येणार नाही : असा विचार काही जण करतात; पण प्रत्यक्षात वस्तूस्थिती उलट आहे. वस्त्रसंहितेचे सूत्र युवावर्गाने मोठ्या प्रमाणात उचलून धरले.
त्यामुळे वस्त्रसंहितेचे अभियान राबवतांना याविषयी पसरवल्या जाणार्या अयोग्य विचारसरणीच्या विरुद्धही आपल्याला लढा द्यावा लागेल. या लढ्यातील एकच प्रभावी माध्यम आहे, ते म्हणजे प्रत्येक देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करणे ! तसे केल्यासच विरोधकांची तोंडे बंद करता येतील ! त्यासाठी सिद्ध रहायला हवे !
– श्री. गुरुप्रसाद गौडा