धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे स्वत: उच्च न्यायालयात उपस्थित !
श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !
संभाजीनगर – श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने आदेश देऊनही संबंधितांवर गुन्हे नोंद न केल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी २ सप्टेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे स्वत: न्यायालयात उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी गुन्हे नोंद न करण्याविषयी क्षमा मागणारे शपथपत्र प्रविष्ट करण्याची अनुमती घेतली. या संदर्भात सरकार सर्वाेच्च न्यायालयात गेले असून तेथे ९ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याने उच्च न्यायालयात पुढील सुनावणी २५ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.
गत वेळेस उच्च न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त मुख्य कारभार असलेल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना नोटीस देऊन, जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. २५ सप्टेंबर या दिवशी पुढील सुनावणीसाठी धाराशीव जिल्हाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी काम पाहिले, तर अधिवक्ता (कु.) देवश्री देशपांडे यांनी साहाय्य केले.