देवीची शिकवण प्रत्येक आईने तिच्या मुलीला द्यावी ! – सौ. क्षितिजा देशपांडे
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘शौर्यजागृती प्रशिक्षण शिबीर’ पार पडले !
जळगाव, ७ सप्टेंबर (वार्ता.) – नवरात्रीमध्ये देवीने केवळ नऊ दिवसच नाही, तर नऊ रात्र असुरांशी युद्ध केले. ही शिकवण प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यायला हवी. आजची तरुणाई पाश्चात्त्यांप्रमाणे ‘डे’ साजरे करण्यात व्यस्त आहे; पण आपल्या धर्मामध्ये एकत्र कुटुंबपद्धती असल्याने आपल्याला पाश्चात्त्यांप्रमाणे आई-वडिलांसाठी वेगळा दिवस काढावा लागत नाही, तर आयुष्यभर त्यांची सेवा करावी, असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते. त्यामुळे असे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकता नाही. स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता आदराने, नम्रतेने पहाणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवा, असे मार्गदर्शन तायक्वांदो प्रशिक्षित असलेल्या सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले. त्या जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिरात बोलत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणार्थ ‘शौर्यजागृती प्रशिक्षण शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणार्थ ‘शौर्यजागृती प्रशिक्षण शिबीर’ जळगाव जिल्ह्यातील महाबळ परिसरात आयोजित करण्यात आले होते. शिबिरातून स्वरंक्षणासाठी कराटेचे प्रकार आणि सुटकेचे काही तंत्र युवतींना शिकवण्यात आले. उपस्थित १०० हून अधिक युवतींनी ‘आता रडायचे नाही, तर लढायचे’ असा निर्धार केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या रणरागिणींनी विविध विषयांवर युवतींना संबोधित केले.
सहभागी युवतींचा अभिप्राय !
‘‘सध्याच्या घटनांमुळे आम्हा सर्व वसतीगृहात रहाणार्या मुलींना, तसेच आमच्या पालकांना काळजी वाटत असते. शिबिराच्या माध्यमातून स्वतःच्या रक्षणाचा आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला आहे. येथून पुढे होणार्या प्रशिक्षणवर्गांमध्ये आम्ही नियमित उपस्थित राहून स्वरक्षणार्थ परिपूर्णपणे सिद्ध होऊ.’’