विविध कारणांसाठी ओळखपत्रांच्या छायांकित प्रती पुरावा म्हणून देतांना त्यावर योग्य कारण किंवा उद्देश यांचा उल्लेख करावा !
साधकांसाठी सूचना
आपल्याला अनेक कारणांसाठी आपल्या ओळखपत्रांच्या छायांकित प्रती (उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स इ. सारखे पुरावे) पुरावे म्हणून सादर कराव्या लागतात. गृहनिर्माण, वाहन किंवा इतर कर्ज काढण्यासाठी, बँक खात्यासाठी किंवा भ्रमणभाषसाठी नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठीही आपल्याला कागदपत्रे (ओळखपत्रांच्या छायांकित प्रती) द्यावी लागतात. जवळपास सर्वच ठिकाणी आपल्याकडून घेतल्या जाणार्या या कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित प्रती (Self Attested copy) मागितल्या जातात. आपणही लगेच त्या कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी करून देतो; मात्र स्व-प्रमाणित कागदपत्र पुरावा म्हणून देतांना ते कोणत्या कारणासाठी देत आहोत, याचा उल्लेख न करता त्यावर केवळ स्वाक्षरी करून दिल्यास अशा कागदपत्रांचा गैरवापर होण्याची अधिक शक्यता असते, उदा. तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, भ्रमणभाषचे देयक आतंकवाद्यांच्या हाती लागू शकते. ते त्याचा वापर तुमच्या नावावर सिम खरेदी करणे, त्याचा वापर आतंकवादी कारवायांमध्ये करणे इत्यादी गैरकृत्यांसाठी करू शकतात. सिमकार्ड आपल्या नावावर असल्याने त्या गैरकृत्यांविषयी आपली चौकशी होणे, आपल्यावर संशय येणे इत्यादी गंभीर परिणाम होऊ शकतात.
असे निदर्शनास आले आहे की, बहुतेक आतंकवादी कारवायांमध्ये ‘स्व-प्रमाणित’ कागदपत्रे सिमकार्ड विक्रेत्यांकडून घेतली जातात; म्हणून सतर्कतेच्या दृष्टीने आपण ‘स्व-प्रमाणित’ (Self Attested) दस्तऐवज (कागदपत्रे) पुरावा म्हणून देतांना खालील सूत्रांचा समावेश करावा, जेणेकरून ती कागदपत्रे अशा गैरकृत्यांमध्ये पुन्हा वापरली जाऊ शकणार नाहीत आणि संभाव्य धोका टाळू शकतो.
१. स्वाक्षरी
२. दिनांक
३. कागदपत्र देण्याचे कारण/उद्देश
४. इतर कारणांसाठी वापरू नये.
– अधिवक्ता रामदास केसरकर (सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार) आणि अधिवक्त्या (सौ.) दीपश्री जाखोटिया, फोंडा, गोवा. (ऑगस्ट २०२४)