हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले सकारात्मक पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830363.html
५. सोलापूर
५ अ. प्रशिक्षणवर्गात येऊन साधनेला आरंभ केल्यानंतर व्यावहारिक अडचणी दूर होणे आणि कुटुंबियांनीही साधनेला आरंभ केल्याने त्यांना आनंद मिळणे : ‘श्री. बसवराज पाटील यांच्या घरात प्रतिदिन काहीतरी कारणांमुळे भांडण होत असे. त्यांच्या घरात आर्थिक अडचणी पुष्कळ होत्या. त्यामुळे त्यांच्या हातात पैसा टिकत नव्हता. ते हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात जाऊ लागले. तेथे साधना सांगितली जात असल्याने त्यांना साधनेची ओढ लागली. हळूहळू त्यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व कळले. त्यांनी स्वतः १ घंटा नामजप करायला आरंभ केला आहे. त्यांनी घरात नामपट्ट्यांचे छत लावले आणि ते वास्तूशुद्धीही करू लागले. तेव्हापासून त्यांच्या बर्याच अडचणी दूर झाल्या. आता त्यांची पत्नी, भाऊ आणि वहिनी हेसुद्धा व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता ते आणि त्यांचे कुटुंब पहिल्यापेक्षा पुष्कळ आनंदात अन् समाधानात जीवन जगत आहेत.
५ आ. प्रशिक्षणवर्गात येऊ लागल्यापासून आत्मविश्वासात वाढ होणे अन् इतरांनाही साधना सांगण्यास आरंभ करणे : श्री. बसवराज यांच्यामध्ये पूर्वी आत्मविश्वास नव्हता; म्हणून त्यांना समाजात जाऊन सर्वांमध्ये मिसळणे जमत नव्हते. प्रशिक्षणवर्गात सहभागी झाल्यापासून त्यांना समाजात जाऊन बोलणे आणि मिसळणे शक्य होत आहे. त्यांच्यामध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आता त्यांनी इतरांनाही नामजप आणि समष्टी सेवा यांचे महत्त्व सांगायला आरंभ केला आहे.
६. कोल्हापूर
६ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे दोन बहिणींमधील भांडणे बंद होऊन त्यांनी एकमेकींना समजून घेणे अन् कुटुंबियांनीही नामजपाला आरंभ करणे : कोल्हापूरमधील घुणकी या गावी प्रशिक्षणवर्गातील मुलींना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवायला प्रारंभ करण्यात आला. या वर्गाला कु. स्नेहा सरनाईक आणि कु. राजनंदिनी सरनाईक या २ बहिणी येत होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले, ‘‘या दोन बहिणींची आपापसांत सतत भांडणे व्हायची; पण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यानंतर त्यांच्यात भांडणे होणे बंद झाले अन् त्या दोघी एकमेकींना समजून घ्यायला लागल्या.’’ मुलींच्या कुटुंबियांच्या मनामध्ये समितीविषयी काही अपसमज होते. ते मुलींच्या वागण्यातील सकारात्मक पालटांमुळे दूर झाले आणि त्यांनीही नामजप करायला आरंभ केला. कुटुंबियांतील वादाचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळे शेजारच्या काकूंनीही मला सांगितले, ‘‘तुम्ही मुलींना काय शिकवले ?’, ते माझ्या नातवंडांनाही शिकवा.’’
६ आ. सरपंचांनी प्रशिक्षणवर्गाला विरोध केल्यावर त्यांना ‘हे धर्माचे कार्य आहे, वर्ग चालूच रहाणार’, असे ठणकावून सांगणारे श्री. सतीश चव्हाण ! : नौकूड या गावामध्ये ‘शौर्यजागृती प्रशिक्षणवर्ग’ चालू होता. तेव्हा तेथील धर्मनिरपेक्ष विचारांच्या सरपंचांनी त्या वर्गाला विरोध केला. ज्या शाळेमध्ये हा वर्ग चालायचा, त्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनाही सरपंचांनी ‘तुम्ही यांना वर्ग घ्यायला अनुमती कशी दिली ?’, असा जाब विचारला अन् ‘अनुमती देऊ नये’, असा आदेश दिला.
या वर्गाला गावातील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. सतीश चव्हाण यायचे. त्यांनीच मुलांचे संघटन केले होते. गावच्या सरपंचांनी शौर्यजागृती प्रशिक्षणवर्गाला विरोध दर्शवल्यावर त्यांनी सरपंच आणि ग्रामसदस्य यांना ठणकावून सांगितले, ‘‘हे धर्माचे कार्य आहे आणि मुले चांगलेच शिकत आहेत. त्यामुळे आम्ही वर्ग बंद करणार नाही. वर्ग असाच चालू रहाणार.’’ गावात आणि विशेषतः युवकांवर सतीशदादांचा प्रभाव असल्याने, तसेच त्याचे नेतृत्व उत्तम असल्याने सरपंचांनासुद्धा माघार घ्यावी लागली. त्यामुळे वर्ग चालू राहिला.’
६ इ. स्वतःच्या स्तरावर २५ पेक्षा अधिक वेळा फलकलेखन करणारा श्री. ओमकार पाटील ! : श्री. ओमकार पाटील हा युवक सिरसे (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रशिक्षणवर्गात नियमित यायचा. तो नियमितपणे नामजप करू लागला आणि त्याने फलकलेखनाची सेवा चालू केली. आरंभी त्याच्या समवेत अन्य कुणीही प्रशिक्षणार्थी सेवेला न आल्याने त्याने ही सेवा वर्ग प्रशिक्षकांचे वेळोवेळी साहाय्य घेऊन स्वतःच्या स्तरावर नियमित चालू ठेवली. हळूहळू गावातील मंडळी त्याला याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारू लागले. गावकर्यांनी त्याला ‘हिंदु राष्ट्रा’विषयीसुद्धा काही प्रश्न विचारले. तेव्हा त्याने त्याला ठाऊक असलेली उत्तरे दिली. त्याला जे ठाऊक नव्हते, ते त्याने वर्ग-प्रशिक्षकांकडून जाणून घेतले. कालांतराने काही गावकरी, मंदिरातील पुजारी आणि युवक यांनी २ – ३ वेळा त्याला फलकलेखन करण्यास साहाय्य केले. ही सेवा तो एकटा चिकाटीने करत असल्यामुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. एकूणच श्री. ओमकार याने स्वतःच्या स्तरावर २५ पेक्षा अधिक वेळा फलकलेखन केले आहे.
७. सिंधुदुर्ग
७ अ. प्रशिक्षणवर्गात देवतांविषयी माहिती मिळाल्यामुळे ‘देव आहे’, असे बहिणीला ठामपणे सांगणारी कु. प्रीतीजा बांदेकर ! : एकदा आडेली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कु. प्रीतीजा बांदेकर हिची बहीण म्हणाली, ‘‘देव इत्यादी काही नसते.’’ तेव्हा प्रीतीजाने तिला सांगितले, ‘‘देव आहे’’; कारण प्रीतीजाला प्रशिक्षणवर्गामध्ये देवतांविषयी सांगितले होते. ‘नामजप का करावा ?’, याविषयी त्यांना माहिती दिली होती. त्यामुळे ‘देव असतो’, हे प्रीतीजा तिच्या बहिणीला ठामपणे सांगू शकली. प्रीतीजाने तिच्या बहिणीला सांगितले, ‘‘तू नामजप करून बघ. तुलापण त्याची कधीतरी अनुभूती येईल.’’
८. नंदुरबार
८ अ. प्रशिक्षणवर्गातील युवतींमध्ये हिंदु धर्माविषयी प्रेम निर्माण होणे : तळोदा (नंदुरबार) येथे डिसेंबर २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर युवतींचा प्रशिक्षणवर्ग चालू झाला. आधी या वर्गातील मुलींना ‘हिंदु धर्माची स्थिती कशी आहे ?’, याविषयी काहीच ठाऊक नव्हते; पण वर्गात आल्यानंतर त्यांना धर्माविषयी समजले. ‘त्यावर काय प्रयत्न करायचे ?’, हे त्यांना शिकायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या मनात धर्माविषयी प्रेम निर्माण झाले आहे.
महाविद्यालयामध्ये अन्य धर्मीय विद्यार्थी फलक आणि बाक यांवर हिंदु देवतांविषयी अयोग्य शब्दांत लिहित होते. त्या वेळी प्रशिक्षणवर्गातील मुलींनी त्यांना त्याविषयी परखडपणे विचारण्याचा प्रयत्न केला. एक अन्य धर्मीय शिक्षक हिंदूंच्या देवतांविषयी चुकीचे सांगत असतांना प्रशिक्षणवर्गातील युवतीने ‘हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता किती श्रेष्ठ आहेत !’, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अन्य कुणीही विद्यार्थी तिच्या बाजूने बोलले नाहीत, तरीही तिने एकटीने सर्व उत्तरे दिली.
९. अमरावती
९ अ. प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यावर वर्गात येणार्या मुलींनी त्रास देणार्या मुलांना मारून पोलिसांच्या स्वाधीन करणे : अमरावतीमधील चांदुरी या गावातील प्रशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमी मुलींनी सांगितले, ‘‘आम्ही सायकलने ३ – ४ कि.मी. ये-जा करायचो. तेव्हा येतांना काही गुंड मुले आम्हाला रस्त्यात अडवायची. प्रतिदिन आम्हाला हा अनुभव येत होता.’’ त्या मुलींनी आम्हाला विनंती केली, ‘‘तुम्ही आम्हाला स्वसंरक्षण प्रशिक्षण द्याल का ?’’ त्यानंतर गावात ८ – १० प्रशिक्षणवर्ग चालू झाले.
प्रशिक्षणवर्गात येणार्या सर्व मुलींनी धाडस करून त्रास देणार्या मुलांना चांगलीच चपराक दिली. मुलींनी त्यांना मारत मारत गावात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा मुलींनी सांगितले, ‘‘प्रशिक्षणातून आम्हाला हे धाडस मिळाले’’ आणि त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे आभार मानले.
९ आ. ‘प्रशिक्षणवर्गामुळे आत्मविश्वास वाढून स्वावलंबी होता आले’, असे मुलींनी सांगणे : बडनेरापासून जवळ असणार्या वरुडा येथील मुलींनी सांगितले, ‘‘आम्ही प्रशिक्षणवर्गाला येत होतो; म्हणून आम्ही आता स्वतःचे काम आत्मविश्वासाने आणि कुणावरही अवलंबून न रहाता करू शकत आहोत.’’ (१६.५.२०२४) (समाप्त)
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |