दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था
अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !
कोल्हापूर – अनेक घरगुती श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसात विसर्जन होते. ८ सप्टेंबर या दिवशी असणार्या या विसर्जनासाठी मात्र महापालिकेच्या वतीने प्रचंड अनास्था दिसून आली. पंचगंगा नदीकाठी आणि परिसरात ठिकठिकाणी कचरा, निर्माल्य यांचे ढीग होते. मध्यंतरी पाणी वाढून परत ते खाली गेल्यानंतर घाट आणि परिसराची जी स्वच्छता होणे अपेक्षित होती ती झालेली नव्हती. सगळ्यात धक्कादायक म्हणजे नदीशेजारील असलेल्या एका नाल्याचे पाणी वहात येऊन ते थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. हा प्रकार भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारा होता.
या संदर्भात सायंकाळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी सायंकाळी नदीवर जाऊन पहाणी केली आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. पंचगंगा नदीवर आल्यावर एके ठिकाणी ‘बॅरीकेड्स’ तसेच आढळून आले. यामुळे तेथे येणार्या भाविकांना त्रास होत होता.
या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदयभाऊ भोसले म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासन वर्षभर विविध नाले, भुयारी गटारी, तसेच अनेक मार्गांनी होणार्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करते आणि वर्षातून केवळ एक दिवस येणार्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, असे सांगते. या प्रदूषणासाठी काहीच न करता महापालिका प्रशासन कृत्रिम कुंड, तसेच अन्य गोष्टींवर लाखो रुपये व्यय करते. हे अत्यंत अयोग्य असून हे प्रदूषण महापालिकेने न थांबवल्यास आम्ही मोठे आंदोलन उभे करू.’’
हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘७ सप्टेंबर या दिवशी सकाळपासून आम्ही या परिसरात आहोत. नदीत मिसळणारा नाला आणि त्या संदर्भातील छायाचित्र-चित्रीकरण आम्ही महापालिका प्रशासनाला पाठवले; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे पाणी पूर्णत: रस्त्यावरून वहात येऊन नदीत मिसळते. त्यामुळे ८ सप्टेंबरला दीड दिवसांचे श्री गणेशमूर्तींचे जे विसर्जन होणारे आहे, ते भाविकांनी कसे करायचे ? त्यामुळे आम्ही सर्व भाविकांना, गणेशभक्तांना आवाहन करतो की, भाविकांनी महापालिकेच्या फसव्या आवाहनाला बळी न पडता त्यांनी पंचगंगा नदीतच विसर्जन करावे आणि हिंदूंच्या परंपरांचे पालन करावे.’’
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘प्रशासन आणि अन्य संघटना या वर्षभर झोपा काढतात आणि केवळ गणेशोत्सव आल्यावर जागे होतात. आता जो नाला नदीत मिसळत आहे, ते पाहिल्यावर महापालिकेला खरोखरच प्रदूषणमुक्तीसाठी काही प्रयत्न करायचे आहेत का ? असा प्रश्न निर्माण होते ? त्यामुळे महापालिकेने प्रदूषणमुक्तीचे नाटक न करता खरोखरच प्रदूषणमुक्तीसाठी काम करावे. याचमवेत सर्व हिंदु संघटनांच्या वतीने आम्ही आवाहन करतो की, भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे हे नदीतच करावे.’’
या संदर्भात ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे म्हणाले, ‘‘या नाल्याचे वहात येणारे पाणी पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या मंदिरावर पडत आहे. यावरून महापालिकेला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी काहीएक देणे-घेणे नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणार्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो.’’
संपादकीय भूमिका :भाविकांच्या धार्मिक भावनांचे मूल्य ‘शून्य’ असणारे महापालिका प्रशासन ! |