‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !
खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे आणि या साम्यवादी इकोसिस्टीमचा बुरखा फाडणे, हे कठीण कार्य आहे.
गेली २५ वर्षे सनातन संस्था हिंदु धर्माचे प्रचाराचे कार्य अत्यंत तेजस्वीपणे करत आहे. हे वर्ष सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून याच काळात संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे. या २५ वर्षांत सनातनचा छळ करणारे दुसरे-तिसरे कुणी नव्हते, तर अर्बन नक्षलवाद्यांची साम्यवादी इकोसिस्टीम होती ! ‘अंधश्रद्धा निर्मूलनवादी संघटनां’च्या नावाने ही साम्यवादी इकोसिस्टीम कार्य करत होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही चळवळ प्रथम कोल्हापूर येथे चालू झाली. त्या वेळी तिचे नाव होते, ‘मानवीय नास्तिक मंच’ ! यातील नास्तिक शब्दाचा अर्थ काय ? नास्तिक म्हणजे देव-धर्म न मानणारे ! ज्यांना देव-धर्म मानायचा नाही, त्यांचा मंच होता तो. पुढे त्याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, असे गोंडस नाव ठेवण्यात आले.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साम्यवादी (लेफ्ट) इकोसिस्टीम’ काय आहे ? मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादी नॅरेटिव्ह’ (कथानक) बनवतात ही धोक्याची घंटा, साम्यवादी आणि मुसलमान यांनी एकत्र काम करून सनातन धर्माला नष्ट करणे, विद्यापिठे आणि अर्बन नक्षलवाद्यांची इकोसिस्टीम आणि कोरेगाव-भीमा प्रकरणातील अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग आणि न्यायव्यवस्थेचे त्यांना साहाय्य’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830319.html
६. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध !
यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही वेगळी नाही. नाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे; पण त्यांचे काम श्रद्धा निर्मूलनाचे ! त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना त्यामध्ये अनेक हिंदुविरोधी कलमे घेतली होती, उदा. कोणत्याही मूर्तीसमोर बळी दिला, तर तो दंडनीय गुन्हा ठरेल. येथे लक्षात घेतले पाहिजे की, मूर्तीपूजा फक्त हिंदु धर्मातच आहे, म्हणजे ईदच्या कुर्बानीच्या नावे कितीही बकरे कापले, तरी ती अंधश्रद्धा आणि गुन्हा नाही ! वर्ष २०११ मध्ये काँग्रेस सत्तेत असतांना महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचा अहवाल होता, ‘महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या ५५ संघटना आहेत. त्याच्यातील ५० वी संघटना ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. त्यांचे २ कार्यकर्ते नरेंद्र भूर्ले, नरेश बनसोड हे गोंदीया या ठिकाणी नक्षलवादी कारवायांमध्ये शस्त्रासहित पकडले होते. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी शस्त्रास्त्रांची आवश्यकता असते का ? त्यामुळे हे सुद्धा अर्बन नक्षलवादीच आहेत. डॉ. दाभोलकरांना ‘स्विस एड् फाऊंडेशन’सारख्या भारतविरोधी संघटनांकडून कोट्यवधी रुपये मिळतात. ‘स्विस एड् फाऊंडेशन’ तिच्या संकेतस्थळावर भारतातील काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवते !
यावरून लक्षात येते की, तेसुद्धा या भारतविरोधी इकोसिस्टीमचाच भाग आहेत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांकडून सरकारच्या निषेधाचा फलक कसा लागतो ?
७. अर्बन नक्षलवाद्यांचा खोटारडेपणा
अ. एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देतांना दाभोलकर परिवाराने म्हटले, ‘‘फाशीच्या शिक्षेला आमचा विरोध होता. आम्ही मानवतावादी आहोत.’’ १४ ऑगस्टला याच दाभोलकर परिवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली, ‘शिक्षा झालेल्यांना फाशी व्हावी !’
आ. डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहाच्या कपड्यांमध्ये एक विदेशी सीमकार्ड सापडले होते. त्यावरून संपर्कही झाल्याचे अन्वेषणात उघड झाले. तुम्ही पारदर्शक आहात, तर विदेशातील लोकांशी संभाषण करण्यासाठी वेगळे सीमकार्ड ठेवण्याची आवश्यकता काय होती ? वृत्तवाहिनीवर मात्र दाभोलकर परिवाराने हसत सांगितले, ‘‘आज काल तर सर्वच जण विदेशातील सीमकार्ड ठेवतात.’’
इ. याच दाभोलकर परिवाराने सांगितले, ‘‘आम्ही विदेशातील धन घेत नाही. आमच्यावर आरोप होऊ नयेत, म्हणूनच आम्हीच हे ‘एफ्.सी.आर्.ए.’चे (विदेशी योगदान (नियमन) कायद्याचे) प्रमाणपत्र रहित करण्याची सूचना सरकारला केली. प्रत्यक्षात ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या अधिवक्त्यांनी ‘अंनिस विदेशातील कसे धन घेत आहे’, याचे पुरावे माहितीच्या अधिकारातून काढून केंद्र सरकारला दिले. त्यामुळे सरकारने विदेशी धन घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याकारणाने त्यांचे ‘एफ्.सी.आर्.ए.’चे प्रमाणपत्र रहित केले.
स्वतःचे अपराध लपवण्यासाठी हे अर्बन नक्षलवादी कसे धादांत खोटे बोलतात, याची तुम्हाला कल्पना येईल.
८. हिंदूंनीच हिंदूंचे ‘नॅरेटिव्ह सेट’ (कथानक सिद्ध) केली पाहिजेत !
आपण किती दिवस खोटे ऐकत बसणार आहोत ? म्हणूनच ‘हिंदूंनीच हिंदूंचे नॅरेटिव्ह सेट केली पाहिजेत !’ स्वातंत्र्यवीर सावरकर, समर्थ रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भात अर्बन नक्षलवाद्यांनी ‘नॅरेटिव्ह’ पालटले आहेत. आपल्याला हे सर्व पालटायचे आहे. आज डॉ. दाभोलकर प्रकरणात जे निर्दाेष सुटले, त्या हिंदुत्वनिष्ठांची कुठे चर्चा झाली का ?
८ अ. अधिवक्ता संजीव पुनाळेकर : हे ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे अधिवक्ते ! ‘हिंदु युवकांना ‘भगवा आतंकवादा’च्या खोट्या आरोपात गुंतवण्याचे षड्यंत्र चालू आहे’, हे लक्षात आल्यानंतर वर्ष २००८ पासून हिंदुत्वनिष्ठांचे खटले निःशुल्क लढवत आहेत. मालेगाव प्रकरणातील हिंदु युवकांना जामीन मिळवून देण्यात यांचा पुढाकार आहे. यांनी गरिब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. आज प्रत्येक रुग्णालयात १० टक्के खाटा (बेड) हे दारिद्ररेषेखालील रुग्णांना मिळावेत, यासाठीचा कायदा झाला आहे. त्यात त्यांच्या याचिकेचा उल्लेख आहे. त्यांनी ‘सच्चर आयोगाच्या अहवालातून भेदभाव होत आहे’, याची सर्वाेच्च न्यायालयात पहिली याचिका केली. त्यांनी दाभोलकर प्रकरणात गुंतवण्यात आलेल्या युवकांचे वकीलपत्र घेतले; म्हणून या अर्बन नक्षलवाद्यांनी त्यांनाच लक्ष्य केले आणि त्यांनाच ४२ दिवसांच्या कारावासात पाठवले. त्यांच्याविषयी आपण सहानुभूती का निर्माण करू शकलो नाही ?
८ आ. विक्रम भावे : हा समाजसेवी साधक ! यांच्या ३ पिढ्या आयुर्वेदाची परंपरा असलेल्या. विक्रम भावे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हिंदु धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्यासाठी सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आले. घराणे सधन असल्याने आर्थिक अडचण नव्हतीच. विक्रम यांना वर्ष २००८ मध्ये ‘आम्ही पाचपुते’ या हिंदु धर्मावर प्रचंड टीका करणार्या नाटकाला विरोध केला म्हणून अटक करण्यात आली. ५ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. या काळात मधु रडके नावाच्या एका आदिवासी कातकरी युवकाला विनाकारण अडकवले गेले आहे, हे कारागृहात लक्षात आल्यानंतर त्याने न्यायालयीन प्रक्रियेतील आवश्यक पत्रव्यवहार स्वखर्चाने करून, तसेच माहितीच्या अधिकाराचा वापर करून या युवकाची कारागृहातून मुक्तता केली. मालेगाव स्फोटातील काही आरोपी या काळात कारावासात होते. त्यांच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती मिळवून त्याने कारावासातून बाहेर आल्यानंतर ‘मालेगाव स्फोट : अदृश्य हात’, या नावाचे पुस्तक लिहिले. त्याने या पुस्तकात जे सिद्धांत मांडले, ते प्रत्यक्षात वर्ष २०१८ मध्ये म्हणजे ४ वर्षांनी सत्य झाले. उदाहरणार्थ आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्यांनीच सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी ‘आर्.डी.एक्स.’ (स्फोटके) ठेवली होती, हे न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झाले. त्यामुळे काही जणांना जामीन मिळाला. या पुस्तकाची माहिती दैनिक ‘सामना’, ‘नवाकाळ’ आणि ‘ऑर्गनायझर’ ही वृत्तपत्रे सोडून अन्य कुठल्याही वृत्तपत्राने प्रकाशित केली नाही !
सत्याची चाड असलेले विक्रम भावे यांच्यासम व्यक्तीमत्त्व दुर्लभच ! वह्यावाटप, आदिवासी क्षेत्रात निःशुल्क साहाय्य असे सामाजिक कार्य करणार्या विक्रम भावे यांच्या संदर्भात केवळ ते दाभोलकर प्रकरणातील आरोपी असे चित्र दाखवण्यात आले.
ज्या अधिकार्याने या खोट्या गुन्ह्यात अडकवले, ते सुभाष सिंग नावाचे सीबीआय अधिकारी ! ते विक्रम यांना उद्दामपणे म्हणाले, ‘‘माझ्यावर कारवाई करणारी व्यवस्था अद्याप जन्माला आलेली नाही. त्यामुळे मला तुला अटक केली म्हणून मला कुणी जाब विचारणार नाही !’’ दुर्भाग्याने सुभाष सिंग जे बोलले, ते सत्य घडले. विक्रम भावे निर्दाेष मुक्त झाले; परंतु त्यांना या प्रकरणात का गुंतवले गेले होते, याविषयी ना न्यायालयाने विचारले ! ना माध्यमांनी !!
अशांविषयी सहानुभूती करणार्या कथा कोण लिहिणार ? हा माझा प्रश्न आहे !
९. ज्यांनी हिंदूंचा छळ केला, त्यांच्याविरुद्ध बोला !
अ. कॉ. पानसरे यांनी हिंदूंच्या हिताचे कोणते काम केले ? वर्ष १९६२ च्या युद्धाच्या वेळी ज्या निवडक लोकांना भारतविरोधी कारवाया केल्या म्हणून अटक झाली, त्यात १८ वर्षांचे सज्ञान पानसरे होते ! बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे बालपणापासूनच हे देशद्रोही कृत्यात होते ! कसाबने मुंबईवर आतंकवादी आक्रमण केले. त्याला सर्वाेच्च न्यायालयाने फासावर लटकवले.
असे असूनही पानसरे मात्र ‘हे आक्रमण पुण्यातील ब्राह्मणांनी कसे केले’, असे खोटे सांगणार्या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ अख्ख्या महाराष्ट्रात आयोजित करत होते, म्हणजेच पाकिस्तानवादी होते ! ब्राह्मणविरोधी होते ! जातीयवादी होते !
आ. आज माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहांच्या बाजूने अनेक हिंदुत्वनिष्ठ यू-ट्यूबर लिहित आहेत. त्यांना हिरो (नायक) बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत; पण लक्षात घेतले पाहिजे, हे तेच परमवीर सिंह आहेत, ज्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना लाथा-बुक्क्या मारून त्यांचा शारीरिक छळ केला होता !
इ. आजकाल ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने स्वातंत्र्यसंग्रामात काहीच केले नाही’, असे ‘नॅरेटीव्ह सेट’ केले जात आहे. प्रत्यक्ष तत्कालीन साम्यवादी नेते मानवेंद्र रॉय आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वर्ष १९४२ च्या आंदोलनाच्या वेळी ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता. वर्ष १९४२ मध्ये डांगे होते का ? साम्यवाद्यांची भूमिका काय होती ?, असे प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजेत !
ई. ‘मॅच फिक्सिंग’ची चर्चा होते. पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे वडील ‘मॅच फॅक्सिंग’मध्ये अटक झालेले पहिले क्रिकेटर होते. त्यांच्याकडे विदेशी चलन सापडले होते. याविषयी चर्चा घडवल्या पाहिजेत.
उ. नक्षलवादविरोधी मोहिमेत मिलिंद तेलतुंबडे मारला गेला; पण त्याचा भाऊ आनंद तेलतुंबडे मात्र विचारवंत, ही दुटप्पी भूमिका आहे !
हिंदु आणि देश विरोधी कार्य करणार्या अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आपण वैचारिक आक्रमणे करायला शिकणे आवश्यक आहे.
१०. जीवनात श्रद्धेचे महत्त्व
जीवनात श्रद्धेचे महत्त्व काय आहे, हे डॉ. दाभोलकरांना ठाऊक नव्हते. ‘श्रत् सत्यं धीयते यस्यां सा श्रद्धा । – श्रत् म्हणजे सत्य. ज्या भावनेत सत्याचे अधिष्ठान आहे, ती श्रद्धा.’ अशा सत्याधिष्ठित श्रद्धेतूनच निष्ठा सिद्ध होते. त्यातून निष्ठावान अनुयायी आणि कार्यकर्ते सिद्ध होतात; परंतु अशा श्रद्धेच्या अभावी अंनिसला निष्ठावान कार्यकर्ते कधीच मिळाले नाहीत. प्रथम प्रा. शाम मानव डॉ. दाभोलकरांपासून दूर झाले, नंतर आता डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र अंनिसमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे चळवळ वाढण्यापेक्षा दुभंगतच अधिक गेली. याउलट सनातन संस्थेमध्ये श्रद्धायुक्त आचरण शिकवल्याने सहस्रो धर्मनिष्ठ साधक घडले आणि संस्था वृद्धींगत झाली. त्यामुळे दाभोलकरांच्या मृत्यूनंतर जो काही विरोध झाला, त्यातून आम्ही तावून सुलाखून अधिक तेजस्वी झालो. श्रद्धायुक्त आचरण आणि धर्मनिष्ठा यांच्यामुळे आम्ही सनातनचे साधक सनातन धर्माची सेवा करत आहोत. सनातन धर्माचे मानवजातीच्या कल्याणाचे कार्य आम्हा सनातनच्या साधकांच्या हातून सदैव होत राहील. (समाप्त)
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२०.८.२०२४)