धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराचे अवतरण ! – पू. श्री राधेश्यामानंद महाराज, वृंदावन धाम
पलूस (जिल्हा सांगली) ६ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन आरवडे शाखा, पलूसच्या वतीने श्री मंगल कार्यालय, पलूस येथे ४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून हरिनाम संकीर्तन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. वृंदावन धाम येथील पू. श्री राधेश्यामानंद महाराजांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्यात सर्व भक्त सहभागी झाले होते. पू. श्री राधेश्यामानंद महाराजांनी स्वत:च्या मनोगतामध्ये श्रीकृष्ण जन्मकथा सांगितली. ते म्हणाले, ‘‘अनेक जन्मांनंतर भाग्योदय होतो आणि भाग्यवान लोकांना सत्संग मिळतो. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे, त्यास आपण शरण गेले पाहिजे. साधू आणि सज्जन यांचे रक्षण, दृष्टांचा विनाश करणे आणि धर्मसंस्थापना करणे, या ३ गोष्टींसाठी ईश्वराचे अवतरण होत असते.’’ महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व उपस्थित महिला आणि पुरुष भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.