परळ (मुंबई) येथील ‘टाइम्स टॉवर’ला आग
मुंबई – परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाइम्स टॉवरला ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने आगीत कुणीही घायाळ झाले नाही. १४ मजली टाइम्स टॉवरच्या विद्युत् यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. इमारतीच्या ३ र्या ते ७ व्या मजल्यांमध्ये ही आग पसरली. विद्युत् तारा आगीच्या संपर्कात आल्याने मोठा आगडोंब उसळला. दुपारी १२ वाजेपर्यंत आग पूर्ण नियंत्रणात आली. काचेची इमारत असल्याने धूर बाहेर पडण्यास जागा नसल्याने अग्नीशामक दलाच्या जवानांनी इमारतीच्या काही काचा फोडल्या. अग्नीशमनदलाचे जवान, पोलीस, बेस्ट उपक्रम आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.