तासगाव येथे ८ सप्टेंबरला श्रींचा २४५ वा रथोत्सव !
गणपति पंचायतनकडून जोरदार सिद्धता !
तासगाव (जिल्हा सांगली), ७ सप्टेंबर (वार्ता.) – भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबरपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्थानच्या २४५ व्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला. सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी चालू केलेल्या या उत्सवाचे विशेष म्हणजे येथील गणपति मंदिरातील श्री गणेशमूर्ती ही उजव्या सोंडेची असून हा गणपति नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ८ सप्टेंबर या दिवशी श्रींचा २४५ वा रथोत्सव होणार आहे. याची गणपति पंचायतनने जोरदार सिद्धता केली आहे.
७ सप्टेंबर म्हणजे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीचे श्रीमंत पटवर्धन राजवाड्यात आगमन, सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ‘श्रीं’ची १ सहस्र दुर्वायुक्त महापूजा होईल. याचे पौरोहित्य पंडित अनंतशास्त्री जोशी करतील. रात्री ८ ते ९ या वेळेत श्री गणेश मंदिर येथे श्रींचा पं. अनंत शास्त्री, पं. दीपक शास्त्री, पं. अभिषेकशास्त्री, पं. श्रीपाद शास्त्री, पं. अथर्व शास्त्री, पं. सौरभ शास्त्री हे मंत्रजागर सादर करणार आहेत.
‘श्रीं’चा २४५ वा रथोत्सव !
८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४५ वा रथोत्सव होईल. याचे नेतृत्व गौरी गजलक्ष्मी करणार असून या रथोत्सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल. तो स्थानिक काशी विश्वेश्वर मंदिर येथे जाऊन परत श्री गणपति मंदिर येथे येईल. ९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता पंडित गजाननबुवा वाठारकर यांच्या लळीत कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणपति पंचायतन देवस्थानचे विश्वस्त श्री. राजेंद्र पटवर्धन, श्री. राहुल पटवर्धन, श्री. पवन सिंह कुडमल, श्री. अथर्व जोशी यांनी केले आहे.