सार्वजनिक गणेशोत्सवात ओंगळवाणे प्रकार न करता आध्यात्मिक विकास साधा !
१. गणनायकाच्या उत्सवात बीभत्स नाच-गाणे !
गणेशोत्सव काळात जागोजागी उभे केलेल्या मंडपात आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्या प्रकारची गाणी वाजवली जात आहेत, हे पहा ! त्यांच्या आवाजाची आक्षेपार्ह पातळी हा तर स्वतंत्र विषय आहे; पण गाणी नेमकी कोणती वाजत आहेत ? गणनायकाच्या उत्सवात गाणे कुठले, तर ‘नायक नहीं खलनायक हूँ मैं ।’ संपूर्ण जगात कदाचित् आपलाच एक धर्म असा असेल, ज्यातील उत्सवात देवापुढे ‘चोली के पीछे क्या हैं ।’ हे गाणे निर्लज्जपणे वाजवले जाते. ‘तुझ्या उसाला लागलं कोल्हा’, ‘पाडाला पिकलाय आंबा, ‘बघतोय रिक्शावाला’, ‘वाजले की बारा’, ‘टिप टिप बरसा पानी’, ‘आमदार झाल्यासारखं वाटतंय’, ‘हिरोईनी वानी दिसती गं’ ही गजाननापुढे वाजवण्याची गाणी आहेत का ? विनायकाच्या विसर्जन मिरवणुकीत फुल तर्राट होऊन ‘झिंग झिंग झिंगाट’, ‘पोरी जरा जपून दांडा धर’, ‘बोलाव माझ्या डीजेला’, ‘ऊं बोलेगा या ऊं ऊं बोलेगा साला’ असल्या गाण्यांवर अन् त्या गाण्यांपेक्षा अधिक बीभत्स नाच हे तथाकथित गणेशभक्त भर रस्त्यात करत असतात.
२. देवासमोर भक्तीरसाने भरलेले आणि वातावरण प्रसन्न करणारे संगीतच हवे !
ही गणेशभक्ती असू शकते का ? अशा पद्धतीने हिंदु सण साजरे करायचे असतात ? अशा प्रकारे उत्सव साजरे केल्याने हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती अबाधित राहील, असे आपल्याला वाटते का ? ‘ओंगळ नाच-गाण्याचे प्रदर्शन केले की, देवता आपल्यावर प्रसन्न होतील’, असे वाटते का ?
दुहेरी अर्थाची गाणी मनोरंजक असली, तरी कुठली गाणी कुठे लावावीत, याचे भान पाहिजे. तुमच्या खासगी पातळीवरील मेजवान्यांमध्ये जी गाणी लावता आणि जसे नाचता, तशा प्रकारे देवापुढे आणि सार्वजनिक पातळीवर करू नये, एवढी अक्कल पाहिजे. अशा गाण्यांचे ठिकाण देवाच्या पुढे नक्कीच नाही. देवाच्या पुढे भक्तीरसाने भरलेले आणि वातावरण प्रसन्न करणारे संगीतच असायला हवे. त्यातील शब्दही ती देवता आणि त्या अनुषंगाने अध्यात्माची रुजवात करणारेच असायला हवेत. त्या संगीताचा आवाज कानठळ्या न बसवणारा आणि कानांना गोड वाटेल इतकाच हवा. मिरवणुकीतील नृत्यही हिडीस असता कामा नये. त्यातून देव, धर्म, संस्कृती यांचा अपमान होणार नाही, सभ्य बायका-पोरं-वृद्ध यांच्या समोर नाचूनही कुठेही आपल्याला आणि परिवाराला, समाजाला न्यूनपणा येणार नाही. चुकीचा पायंडा पडणार नाही, अशा दृष्टीने मर्यादा पाळून केलेल्या नाचालाही हरकत नाही.
३. सार्वजनिक उत्सवामुळे गणेशभक्ती वाढून धर्महित जपले जाणे आणि लोकांच्या आध्यात्मिक विकासास प्रारंभ होणे
लोकमान्य टिळकांनी मुळात गणरायाच्या या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याला काही कारण होते. परकीय ब्रिटीश सत्तेविरुद्ध लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्यांचे प्रबोधन करण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक केला. आता पालटलेल्या काळात अनुरूप विषयांना धरून समाजाचे प्रबोधन आणि जागृती होणार नसेल, तर कशाला हवा सार्वजनिक उत्सव ? या सार्वजनिक उत्सवामुळे निदान गणेशभक्ती वाढत असून हिंदु धर्माचे हित जपले जाते किंवा लोकांचा आध्यात्मिक विकास व्हायला साहाय्य होत आहे; पण सध्या चुकीच्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे. अतिशय वाईट आणि भलतेच विषारी संस्कार समाजावर मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत, तेही गणेशोत्सवाच्या नावाखाली !
४. पावित्र्य राखता येत असेल, तरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा !
गणपतीचे नाव घेऊन हे जे सगळे चालते, त्याचे भान आपल्याला आहे का ? त्यामुळे हिंदु समाजाची केवढी अपरिमित हानी होते, याची जाणीव आपल्याला आहे का ? व्यक्तीगत पातळीवर तरी या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे आपला काही आध्यात्मिक विकास होतो का ? सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखता येत असेल आणि त्यामागील प्रयोजन लक्षात आले असेल, तरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा. तो यथोचितपणे साजरा करणे जमत नसेल, तर बंद करा !
– श्री. केदार केसकर (९ सप्टेंबर २०२२)