सर्वश्रेष्ठ आणि सच्चिदानंदरूप असणार्या श्री गणेशाची भक्ती करून त्याची कृपा संपादन करा !
श्री गणेशमाहात्म्य !
१. देवतांनी युद्धप्रसंगी श्री गणेशपूजन करून कार्ये सिद्धीस नेणे; पण श्री गणेशाने कुणाचे स्तवन वा उपासना केल्याचे उदाहरण नसणे, यातूनच त्याचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होणे
‘सर्व श्रुति, स्मृति, पुराणे आदींचा अभ्यास केला, तर असे दिसून येते की, ब्रह्मा, विष्णु, महेश, देवी इत्यादी अनेक देवदेवतांनी त्यांच्यावरील कठीण युद्धप्रसंगी श्री गणेशपूजन करून त्याची स्तुती करून कार्ये सिद्धीस नेली आहेत; पण श्री गणेशाने कुणाचे स्तवन वा उपासना केल्याचे उदाहरण आढळत नाही; म्हणजेच ‘श्री गणेश हे दैवत सर्वश्रेष्ठ आहे’, असे मानावे लागेल.
२. कोणत्याही देवस्वरूप वर्णनांमधील ‘वाच्य’ हा भाग मर्यादित असून ‘लक्ष्य’ हा भाग व्यापक, अमर्यादित आणि त्रिकालाबाधित असणे अन् हे जाणूनच ज्ञानीपुरुषांनी सगुण साकार रूपात देवतांची उपासना करणे
कोणत्याही देवस्वरूप वर्णनाचे दोन भाग असतात, पहिला भाग ‘वाच्य’ आणि दुसरा भाग ‘लक्ष्य’ ! यांतील ‘वाच्य’ हा भाग मर्यादित असतो आणि लक्ष्य हा भाग व्यापक, अमर्यादित अन् त्रिकालाबाधित असतो. हे जाणूनच ज्ञानीपुरुष सगुण साकार रूपात त्या त्या देवतांची उपासना करतो.
३. उपनिषदांमध्ये ‘लक्ष्य’ या भागात निर्गुण निराकार श्री गणेशाचे वर्णन केलेले असणे
उपनिषदांतून प्रथम ‘लक्ष्य’ या निर्गुण-निराकार श्री गणेशाचे वर्णन केले आहे.
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षन् तत्त्वमसि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥ – श्री गणपति अथर्वशीर्ष, श्लोक १
अर्थ : (मंगलार्थ ओंकाराने आरंभ केला आहे.) हे गणपते (गणांचा स्वामी), तुला नमस्कार असो. (‘तत् त्वम् असि’ या महावाक्यातील) ‘तत्’ या शब्दाने निर्देशिलेले ब्रह्म प्रत्यक्ष तूच आहेस. तूच सर्व प्राणीमात्रांमधील नित्य, अविनाशी असा आत्मा (आत्मतत्त्व) आहेस.
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।
त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। – श्री गणपति अथर्वशीर्ष, श्लोक ४
अर्थ : तू एकमेवाद्वितीय असा सच्चिदानंदरूप आहेस. ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) तू आहेस. (तू स्थूल-सूक्ष्म अशा सर्व गोष्टींना व्यापून राहिला आहेस.)’
– आचार्य वसंत गोडबोले (संदर्भ : मासिक ‘धनुर्धारी’, सप्टेंबर २०१०)