महाराष्ट्रातील श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण ठिकाणांचे माहात्म्य !
वाई (जिल्हा सातारा) येथील ढोल्या गणपति !
वाई (जिल्हा सातारा) येथे कृष्णा नदीच्या किनार्यावर हे देवस्थान आहे. याची बांधणी इ.स.१७६२ मध्ये श्रीमंत गणपती भिकाजी रास्ते यांनी केली. उत्तम प्रतीच्या घडीव दगडापासून हे मंदिर बनवले आहे. भव्य गर्भमंदिर आणि सभामंडप दृष्टीत भरतो. मंदिराचा पार्श्वभाग मत्स्याकृती असल्याने महापुरातही मंदिराची वास्तू सुरक्षित रहाते. अखंड पाषाणाची ही डाव्या सोंडेची मूर्ती १० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. मूर्तीच्या विशाल आकारामुळे ती ‘ढोल्या गणपति’ या नावानेच प्रसिद्ध आहे. – कृष्णाजी कोटी
माळीवाडा गणपति, नगर
हे मंदिर नगर शहराच्या दक्षिणेला माळीवाडा वेशीजवळ आहे. येथील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. हे जागृत स्थान आहे. मंदिर जुन्या बांधणीचे असून पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील सभामंडप प्रशस्त आहे. त्यासमोर जुने दगडी कारंजे आहे. मूर्ती १० फूट उंचीची लंबोदर, वरदहस्त आणि उजव्या सोंडेची आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते चतुर्दशी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी १२ फूट उंचीच्या चारचाकी लाकडी रथातून उत्सवमूर्तीची मिरवणूक काढली जाते. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत पहिला मान या गणेशाचा असतो. – कृष्णाजी कोटी
सातारा येथील खिंडीचा गणपति
सातारा शहराच्या दक्षिणेला ज्या डोंगरावर अजिंक्यतारा गड आहे, त्याच डोंगराच्या दक्षिणेकडील उतारावर खिंडीचा गणपति हे जागृत देवालय आहे. छत्रपती शिवरायांनी गड कह्यात घेतल्यावर त्यांनी मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम करवून घेतले. औरंगजेबाने स्वारी केली असता मूळ मूर्ती सुरक्षित रहाण्यासाठी तिच्यापुढे पक्की भिंत उभारून दुसरी मूर्ती स्थापन केल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून या दुसर्या मूर्तीचीच पूजा-अर्चा केली जाते. ही मूर्ती (सध्याची) मेण, शेंदूर आणि राळ यांच्यापासून बनवलेली आहे. सततच्या शेंदूरविलेपनामुळे सध्या मूर्तीचे मुखमंडल स्पष्टपणे दिसते. – कृष्णाजी कोटी
गणपति पंचायतन संस्थान, सांगली
या संस्थेच्या गणपतीची गणना सांगलीतील सुप्रसिद्ध गणेशांमध्ये केली जाते. श्रीमंत थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी याची स्थापना केली. मंदिराच्या संस्थेचे नाव ‘गणपति पंचायतन संस्थान’ असे आहे. मुख्य श्री गणेश, डावीकडे श्री सांबसदाशिव आणि श्री सूर्यनारायण, तर उजवीकडे श्री चिंतामणेश्वरी आणि श्री लक्ष्मीनारायण अशा देवता अन् त्यांची मंदिरे आहेत. कलाकुसर आणि बांधणीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिर बांधणी ज्योतिबाच्या डोंगरातील उत्तम दर्जाच्या काळ्या दगडाची आहे. घासून गुळगुळीत केलेला दगड वापरला आहे. गाभार्यापुढे पाचखणी ओटा, सभामंडप, नगारखाना असून शिखावर उत्कृष्ट कलाकुसर आहे. नगारखाना नैसर्गिक रंगांच्या लाकडी तुकड्यापासून बनवला आहे. गणेशमंदिराची लांबी ९० फूट, तर रुंदी ६० फूट आहे. कृष्णानदीच्या तीरावर मंदिर आहे. पूजामूर्ती लहानशी आणि सिंहासनस्थ असून तांब्यापासून बनवलेली आहे. उत्सवमूर्ती पूजामूर्तीपेक्षा मोठी आणि सुंदर असून गाभार्यात मध्यभागी आहे. ती पूर्वाभिमुख आहे. वर्षातील ठराविक दिवशी उगवत्या सूर्याचे किरण मूर्तीच्या मुखमंडलावर पडतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धीच्या उभ्या सुंदर मूर्ती आहेत. – कृष्णाजी कोटी
मोदकेश्वर गणपति, नाशिक
हा ‘हिंगण्याचा गणपति’ म्हणून प्रसिद्ध आहे. ५६ गणेश क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र होय. मोदकाकार पाषाणावर मूर्ती विराजमान असल्याने ‘मोदकेश्वर गणपति’ नाव पडले. तारकासुराच्या विनाशासाठी मदनाला शिवपुत्राची आवश्यकता होती. त्यासाठी मदनाने शंकरावर मोहिनी पाडण्याचा प्रयत्न केला; पण शंकराने त्याला भस्म केले. पार्वती आणि अन्य देव यांच्या आज्ञेवरून लोककल्याणार्थ मदनाने हे कृत्य केल्याचे समजल्यावर शंकराने त्याला पूर्ववत् होण्यासाठी गणेशोपासना आणि तप सांगितले. मदनाने रतिसमवेत अनुष्ठान करून गणेशकृपा संपादन केली. तेच हे कामवरद महोत्कट क्षेत्र होय.
दशभुज सिद्धीविनायक, नाशिक
नाशिक येथील गोरेराम मंदिराच्या पश्चिमेस हे मंदिर आहे. ही सिद्धीविनायकाची मूर्ती दशभुज आहे. कोणत्याही मंगलकार्याचा शुभारंभ दशभुज सिद्धीविनायकाच्या पूजेने करण्याची प्रथा नाशिक येथे प्रचलित आहे. – कृष्णाजी कोटी
गणेशलेणी अजिंठा
अजिंठा लेण्यांच्या मागील भागातील गणेशलेणी ३ सहस्र वर्षांपूर्वीची असावीत. ८५० फूट उंचीच्या अखंड शिळेत हे शिल्प कोरलेले आहे. लेण्यांच्या वरच्या भागात दुग्धधवल जलधारा कोसळते. गणेशलेणी अर्ध चंद्राकृती दरीमध्ये आहेत. येथील श्रीसिद्धीविनायकाची सिद्धासन घातलेली मूर्ती असून तिचे मुख पूर्वेकडे आहे. भव्य आणि प्रसन्न अशी ही मूर्ती पाहून अलौकिक अशा आनंदाची अनुभूती प्रत्ययास येते. – कृष्णाजी कोटी
तिळ्या गणपति, नाशिक
गणेशवाडी नाशिक येथे दगडूशेठ सोनार यांच्या घराचा पाया खोदण्याचे काम चालू होते, तेव्हा ही मूर्ती सापडली. तिळी चतुर्थीला येथे यात्रा भरते, म्हणून या गणपतीला ‘तिळ्या गणपति’ हे नाव पडले. – कृष्णाजी कोटी