श्री गणेशअथर्वशीर्षाचे महत्त्व !
१. अथर्वशीर्षाच्या पठणाने बुद्धी आणि मन स्थिर होते !
‘थर्व’ म्हणजे हालणारे आणि अथर्व म्हणजे ‘न हलणारे शीर्षम्’ । सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्षाचे पठण केले की, बुद्धी आणि मन स्थिर होते, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेले काम यशस्वी होते. आत्मविश्वास वाढतो, माणूस नम्र होतो. तो अडचणींमध्येही संधी शोधतो, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते. जीवनात यशस्वी होणारी माणसे नेहमी अडचणींमध्ये संधी शोधतात आणि जीवनात नेहमी अयशस्वी होणारी माणसे संधीतही अडचणीत सांगतात.
२. मन कणखर होऊन आपण संकटांवर मात करू शकतो !
अथर्वशीर्ष पठणामुळे मन एकाग्र होते. मनाची ताकद वाढवणे हे आपल्याच हातात असते. माणसाचे मन विलक्षण गोष्ट आहे. शरिरासह मन कणखर असेल, तर आपण संकटांवर मात करू शकतो. मन स्थिर असेल, तर आपण ते वर्तमानात ठेवून काम करू शकतो. बर्याच लोकांचे मन वर्तमानकाळात नसते. शरीर वर्तमानकाळात असले, तरी मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात असते. मन भूतकाळात असले, तर दु:खद घटना आठवतात आणि मन भविष्यकाळात असले, तर चिंता भेडसावू लागतात. त्यामुळे बुद्धी आणि मन स्थिर हवे. हे अथर्वशीर्ष पठणाने साध्य होते.
३. अथर्वशीर्षामध्ये असणारा गणेश म्हणजे या विश्वातील निसर्गच होय !
अथर्वशीर्षाचा पाठ एकदा, ११ वेळा, २१ वेळा किंवा १ सहस्र वेळा केला जातो. एकदा तरी हा अनुभव घ्या. तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझे म्हणणे तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहात असाल, तरीही अथर्वशीर्ष नक्कीच आवडेल; कारण त्यात असणारा गणेश म्हणजे या विश्वातील निसर्गच होय ! ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहेत’, असे म्हटले आहे. ‘हा निसर्ग म्हणजेच ईश्वर’ हे म्हणणे तुमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला पटेल. ‘या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे, तरच निसर्ग आपणास जपेल’, असे म्हणता येईल.
– श्री. अनिल अच्युत काळे