दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !; आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !…
२० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !
मुंबई – दिंडोशीमधील बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत. अग्नीशमन दलाच्या गाड्या, तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचून बचावकार्य चालू आहे. ही इमारत २० मजल्यांची आहे.
आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !
रायगड – ‘मुंबई-देहली एक्सप्रेसवे’च्या अंतर्गत बडोदा ते जे.एन्.पी.टी. महामार्गाचे काम चालू आहे. त्यातील बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. बोगद्याची लांबी सवाचार किलोमीटर, तर रुंदी २२ मीटर आहे. बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास १० मिनिटांत करता येईल.
‘अंधेरीच्या राजा’च्या दर्शनासाठी यंदाही वस्त्रसंहिता !
मुंबई – आझादनगर येथील ‘अंधेरीचा राजा’ असणार्या मंडळाच्या श्री गणेशाच्या दर्शनासाठी वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करण्यात आली आहे. मंडपात अर्धी पँट घालून न येता पुरुषांना लुंगी घालावी लागणार आहे, तर महिलांना स्कर्टच्या ऐवजी पूर्ण पँट घालावी लागेल. या गणेश मंडळाने हा नियम १६ वर्षांपूर्वी लागू केला असून तो प्रतिवर्षी पाळला जातो.
रुग्णवाहिकेअभावी २ मुलांचे मृतदेह घेऊन १५ किलोमीटर पायपीट !
गडचिरोली – येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्णवाहिका नसल्याने दोन्ही मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांना १५ किलोमीटर जावे लागले. एका अशिक्षित दांपत्याने दोन आजारी मुलांना आधुनिक वैद्यांकडे न नेता तांत्रिकाकडे नेले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिका : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आरोग्याच्या मूलभूत सुविधा नसणे दुर्दैवी !