श्री गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार !
९ दिवसांमध्ये ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजवले !
पुणे – शहरामध्ये सध्या पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने ९ दिवसांमध्ये ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजवले आहेत. पुढील २ दिवसांमध्ये शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठ-मोठे खड्डे प्रशासनाकडून बुजवले जात नसल्याची टीका पुणेकर करत होते.
रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून महापालिका आयुक्तांना निवेदने देण्यात आली होती. (अशी निवेदने का द्यावी लागतात ? प्रशासन स्वतःहून खड्डे का बुजवत नाही ? – संपादक) गणेशाच्या आगमनापूर्वी सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवले जावेत, असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले होते. श्री गणेशोत्सवापूर्वी आणि विसर्जन झाल्यानंतर ५ दिवस खड्डे दुरुस्तीची मोहीम राबण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले की, पाऊस थांबल्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण केली जात आहे. मिरवणूक जाणार्या रस्त्यांची पहाणी करून तेथील सर्व कामे पूर्ण केली जातील.
संपादकीय भूमिका :खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाचे कारण कशाला हवे ? एरव्हीच सर्व रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत, असे वाटणारे प्रशासन हवे ! |