पुणे शहरात गणेशोत्सवात अनुचित घटना टाळण्यासाठी ७ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
पुणे – गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. अनुमाने ७ सहस्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवास ७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून १७ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे. या कालावधीत संभाव्य आतंकवादी कारवाया आणि अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, विशेष शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर आदींनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.
बंदोबस्तात वरिष्ठ अधिकार्यांसह पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, शीघ्र कृती दल (क्यू.आर्.टी.), तसेच केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या, होमगार्ड आणि बाँब शोधक आणि नाशक (बी.डी.डी.एस्.) पथकांचा समावेश असेल, तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलीस मित्रांचे साहाय्य घेतले जाणार आहे. दीड सहस्रांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे लक्ष्य रहाणार आहे.
संपादकीय भूमिका :एका शहरात सहस्रो पोलिसांचा बंदोबस्त करावा लागणे आणि दहशतीखाली गणेशोत्सव साजरा करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! |