कर्णाला ब्रह्मास्त्र लाभले नाहीच !
पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ५० किलो वजनी गटात अपात्र ठरवल्याचे प्रकरणाचे खरे स्वरूप !
बर्याचदा वस्तूस्थिती ठाऊक नसतांनाही आपण एकदम ‘सोशल मिडिया’वर (सामाजिक माध्यमांवर) अत्यंत आत्मविश्वासाने असे काही व्यक्त होतो, जणू काही ती सगळी घटना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोरच घडली आहे आणि आपणच तिचे एकमेव साक्षीदार आहोत…! पण तसे नसते. अनेकदा सामाजिक माध्यमांवर व्यक्त होतांना वास्तविक परिस्थितीची सत्य माहिती नसल्यामुळे आपल्या अभिव्यक्तीची सत्यताच संपून जाते. तिच्यातील सत्त्व नष्ट होते. भावनांचा कल्लोळ टाळून एखाद्या घटनेकडे बघता आले, तर सामाजिक माध्यमांवर अर्धवट माहितीतून मोठ्या अभिनिवेशाने व्यक्त होणार्यांचे प्रमाण बर्याच अंशी कमी होऊ शकेल. असो. विषय पॅरिस ऑलिंपिकमधील ५० किलो वजनी गटातील महिला कुस्ती अंतिम सामन्याचा आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या मूळ वजनी गटात न खेळता त्याहून अल्प असणार्या वजनी गटात खेळायला गेली. तिने त्यासाठी स्वतःचा वजनी गट पालटला. साहजिकच सहभागी होण्याचा क्रमही पालटला; पण ५० किलो वजनी गटात दुसरी पात्र खेळाडू असतांनाही असे कसे झाले ?
लेखक : श्री. मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख ‘आस्था काऊन्सेलिंग सेंटर’, पुणे.
१. मध्यप्रदेशमधील महिला कुस्तीपटू शिवानी पवार हिच्याविषयी…
‘शिवानी पवार’ ही ५० किलो वजनी गटासाठी सहज पात्र ठरेल, अशी खेळाडू असतांनाही विनेश फोगाटने त्याच गटातून खेळण्यासाठी हट्ट का धरला असेल ? शिवानी पवार ही मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नसेल. तिचे वडील श्री. नंदलाल पवार आणि आई सौ. नंदिनी पवार केवळ ३ एकर भूमी कसून शेती करतात. आता ३ एकर शेतीतून असे किती उत्पन्न मिळत असेल ? पण खरोखरच परवडत नसतांना सुद्धा आई-वडिलांनी शिवानीचा हिरमोड केला नाही. विविध ठिकाणच्या कुस्तीच्या स्पर्धा जिंकून रोख बक्षीसे मिळवून त्यातून तिच्या क्रीडाविषयक करिअरचा खर्च भागवला जाई.
सर्बिया येथे वर्ष २०२१ मध्ये झालेल्या ‘यू२३’ या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेली ती पहिलीच भारतीय महिला आहे. म्हणूनच ५० किलो वजनी गटातून ‘पॅरिस ऑलिंपिक २०२४’साठी ती भरवशाची दावेदार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात होते.
२. विनेश फोगाट हिने स्वतःच्या वजनी गटात हरून शिवानी पवार हिला निवड चाचणीच्या पात्रता फेरीत हरवणे
मार्च २०२४ हा महिना फार उलथापालथ करणारा होता. पतियाळामध्ये पॅरिस ऑलिंपिकसाठी कुस्तीच्या निवड चाचण्या चालू होत्या. विनेश स्वतःच्या वजनी गटात निवड चाचणीच्या पात्रता फेरीतच हरली. तिला उपांत्यफेरीमध्येच ०-१० ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिने ५० किलो वजनी गटासाठीची पात्रता मिळवण्यासाठी त्या गटातील पात्र ठरेल, अशा शिवानी पवार हिला ११-६ ने हरवले आणि ५० किलो वजनी गटात स्थान मिळवले. या सगळ्या उपद्व्यापात ‘आपण नक्की चूक करतो आहोत’, याची जाणीव आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनुभवी खेळाडूला असणे अध्याहृत आहे.
३. विनेश फोगाटने निवड समितीशी केलेले अयोग्य वर्तन आणि केलेली अयोग्य मागणी
पतियाळामध्ये नेमके काय झाले, हे सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. पतियाळामध्ये पात्रता चाचण्यांच्या वेळी विनेश फोगाट तब्बल ३ घंटे वाद घालत होती; कारण तिला ५० किलो आणि ५३ किलो अशा दोन्हीं गटातून ऑलिंपिक पात्रता हवी होती अन् ‘५३ किलोची पात्रता चाचणी ऑलिंपिकच्या अगदी अलिकडे घेण्यात यावी’, अशीही तिची मागणी होती. कारण उघड आहे, ‘ऐनवेळी निर्णय घ्यायचे ठरले, तर या वजनी गटात आपल्याखेरीज दुसरा कुणी पर्याय रहाणार नाही आणि ती पात्रतासुद्धा आपल्याला देण्यावाचून कुस्ती फेडरेशनच्या समोर दुसरा कुठला पर्यायच उरणार नाही, हे तिला पक्के ठाऊक होते. म्हणूनच तिने ‘डहॉक समिती’समोर ही मागणी ठेवली. एवढेच नाही, तर ‘तसे लेखी आश्वासन आपल्याला मिळावे’, असाही हट्ट धरला. ३ घंटे सगळी वादावादी चालू होती आणि शेवटी समिती सदस्यांनी तिची मागणी मान्य केली. तिला लेखी आश्वासन मिळाले. या सगळ्या गोंधळात ५० किलो वजनी गटात पात्र ठरण्यासाठी आलेले सगळे खेळाडू तासनतास ताटकळत बसून राहिले.
४. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’चा नियम आणि विनेश फोगाट हिने केलेले अत्यंत चुकीचे कृत्य
आता खरा नियमभंग इथेच झाला आहे, ज्याकडे कुणीच म्हणावे, तसे लक्ष दिले नाही. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’चा स्पष्ट नियम आहे, ‘एका दिवशी एका खेळाडूला केवळ एकाच वजनी गटातून खेळता येईल’; पण इथे तर विनेशने २ वेगवेगळ्या वजनी गटांतून खेळण्यासाठी भाग घेतला.
हरियाणाची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात ऑलिंपिक पात्रता मिळवली होती; पण विनेशने ही चाचणी चालूच होऊ दिली नाही आणि लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली. पंघालने ऑलिंपिक पात्रता आधीच मिळवली होती; पण तरीही विनेशने हा खोडा घालून ठेवला होता. ‘मी मुद्दामच दोन्ही वजनी गटातून पात्रता मिळवली आहे; कारण मला ५३ किलो वजनी गटातून जिंकण्याची खात्री नाही. दुसरे सूत्र, म्हणजे निवड समितीने ऐनवेळी एखादा पालट केला किंवा पात्रतेचा एखादा निकषच पालटला तर ? मला हे ऑलिंपिक हातून निसटू द्यायचे नव्हते’, असे विनेशने पत्रकारांशी बोलतांना तेव्हाच स्पष्ट सांगितले होते.
‘मी ५० किलो वजनी गटात खेळणे वर्ष २०१८-१९ पासूनच थांबवले आहे आणि आता वजन न्यून करणे, हे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक आहे; पण तरीही पॅरिस ऑलिंपिकला जायचे; म्हणून मी वजन न्यून करणार. असे असले, तरी माझा खरा आवडता ‘इव्हेंट ५३’ किलो हाच आहे’, असेही विनेशने पत्रकारांना सांगितले होते. हे सगळे वृत्त आजही ‘गूगल’वर उपलब्ध आहे.
आता विनेश फोगाट हिने केलेल्या या सगळ्या प्रकाराला नेमके काय नाव द्यावे, असा प्रश्न पडणार नाही का ?
५. विनेश फोगाटच्या चुकीच्या वागण्याला आणि परिणामांना उत्तरदायी कोण ?
थयथयाट करून आणि अवास्तव मागण्यांचा दबाव आणून स्वतःची निवड करवून घेतली अन् शिवानी पवार या खेळाडूची पॅरिस ऑलिंपिकची संधी घालवली. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची संधी शिवानी पवारसाठी आता ४ वर्षे पुढे गेली…! याचे उत्तरदायित्व कुणी घ्यायचे, हा तर मोठा गहन प्रश्न आहे.
अत्यंत जिवापाड मेहनत आणि पै पै जमा करून शिवानीला ऑलिंपिकमध्ये जिंकतांना पहाण्याचे तिच्या आईवडिलांचे स्वप्न आता थेट ४ वर्षे पुढे गेले आहे. कालचक्र हे किती अनपेक्षित आणि कठोर परीक्षा पहाणारे असते, हे सूज्ञांना अधिक सांगायला नकोच. म्हणून या सगळ्या प्रकारात खरी हानी झाली ती शिवानी पवार हिची ! आज ऑलिंपिक अंतिम सामन्यापूर्वी विनेशला अपात्र ठरवल्याचा क्षण पहातांना शिवानीला काय वेदना झाल्या असतील, याची कल्पना कुणालाही करता येणार नाही !
६. शिवानीची संधी हिरावून घेऊन विनेशने नेमके काय साध्य केले ?
ही सगळी पूर्वपीठिका पाहिली की, प्रत्यक्ष पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० किलो गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी नेमके जे काही झाले आणि विनेशला अपात्र घोषित करण्यात आले, हे खरोखरच अनपेक्षित आणि धक्कादायक होते का ? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच येते. हा प्रश्न केवळ १०० ग्रॅम वजनाचा नाही, तर अशा एका अविवेकी महत्त्वाकांक्षेचा आहे, जिने कर्मसिद्धांताचा इंगा नेमक्या मोक्याच्या क्षणी दाखवला आहे. महारथी कर्णाने परशुरामांकडून खोटे बोलून मिळवलेली अस्त्रविद्या ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या कामी आली नाही; कारण ती मिळवण्यासाठी त्याने त्याच्या गुरूंशी असत्य व्यवहार केला होता. अन्य महिला कुस्ती खेळाडूंवर अन्याय होऊ नये; म्हणून आंदोलन करणारी विनेश खरी कि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी शिवानी पवारची संधी हिरावून घेणारी विनेश खरी ? असा प्रश्न पडतोच. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि खरोखरच पात्र असलेल्या शिवानीची संधी हिरावून घेऊन विनेशने नेमके काय साध्य केले ?, हा प्रश्न समाजाने तिला परखडपणे विचारणे नितांत आवश्यक आहे.
(लेखक श्री. मयुरेश उमाकांत डंके हे स्वतः क्रीडा मानसतज्ञ असून अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील खेळाडूंना गेल्या अनेक वर्षांपासून मानसशास्त्रीय तंत्रांचे प्रशिक्षण देतात.)
(श्री. मयुरेश उमाकांत डंके यांच्या फेसबुकवरून साभार)