गुरुकार्याची तीव्र तळमळ असणार्या जळगाव सेवाकेंद्रातील साधिका कु. सोनल विभांडीक !
१. कु. सोनल विभांडीक यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव यांची भाजीवाल्यांशी भेट घडवून आणणे आणि पहिला सत्संग घेणे
‘कु. सोनल विभांडीक जळगाव सेवाकेंद्रात स्वयंपाक करण्याची सेवा करतात. एके दिवशी सोनलताई मंडईतून आश्रमासाठी अर्पणात पुष्कळ भाजी घेऊन आल्या. तेव्हा सद्गुरु जाधवकाका (सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव) यांनी सोनलताईंना विचारले, ‘‘कुठून आणली एवढी भाजी ? त्या भाजीवाल्यांना खाऊ देतेस कि नाही ? मी त्या भाजीवाल्यांच्या घरी येतो. माझे त्यांना भेटण्याचे नियोजन कर.’’ पुष्कळ वर्षांपासून अध्यात्मप्रसाराची सेवा केलेली नसूनही सद्गुरु जाधवकाकांच्या आज्ञेने सोनलताईंनी तळमळीने सहसाधकांचे साहाय्य घेऊन सद्गुरु काकांच्या भेटीचे नियोजन केले. त्यानंतर त्या भाजीवाल्यांच्या मागणीनुसार ताई नियमित सत्संगांचेही नियोजन करू लागल्या.
२. सोनलताईंनी सत्संगाचे दायित्व घेऊन सर्व सेवा तळमळीने करणे
सोनलताई अनेक वर्षे सेवाकेंद्रात राहून सेवा करत असल्यामुळे अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना सत्संग घेण्याची सेवा त्यांना कठीण वाटत होती. अन्य साधकांनाही इतर सेवांमुळे सत्संगाच्या सेवेसाठी वेळ देणे कठीण होते. तेव्हा सत्संगसेवेचे दायित्व स्वीकारून सोनलताई स्वतः सर्व सेवा तळमळीने करू लागल्या. सत्संगात विषय व्यवस्थित मांडता यावा, यासाठी त्या बराच वेळ सराव करतात.
३. सत्संगाला येणार्या जिज्ञासूंशी आपुलकीने वागणे
सत्संगाची सेवा करतांना त्यांच्या सांगण्यात आणि वाणीत गोडवा असतो, तसेच त्यांना सत्संगातील जिज्ञासूंप्रती आपुलकी वाटते. त्यामुळे सर्व जिज्ञासूंना त्यांचा सत्संग फार आवडतो.
४. सत्संगाला जाण्यासाठी सायकलचा वापर करणे
कु. सोनलताई यांना दुचाकी वाहन चालवणे जमत नसे आणि वाहन चालवण्याचा परवानाही त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळे सत्संगाच्या सेवेसाठी जाण्यास त्यांना पुष्कळ अडचणी येत. तेव्हा सोनलताई सत्संगाला जाण्यासाठी सायकल वापरू लागल्या. सत्संगासाठी त्या सायकलवर १३ – १४ कि.मी.चा प्रवास करू लागल्या.
५. सत्संगाहून परत येतांना अर्पणात काही भाज्या आणणे
सत्संगाहून परत येतांना त्या सेवाकेंद्रात स्वयंपाकासाठी मंडईतून काही भाज्यासुद्धा अर्पणातून आणतात. एखादी गृहिणी ज्याप्रमाणे घरकाम आणि नोकरी सांभाळते, त्याप्रमाणे सोनलताईसुद्धा सत्संगाची सेवा करतांना आश्रमाची देखभालही करतात.
६. अधिक संख्येने सत्संग चालू करणे
एकच सत्संग घेऊन अल्पसंतुष्ट न रहाता सोनलताईंनी सेवेची व्याप्ती वाढवली. त्यांनी आणखी २ ठिकाणी सत्संग चालू होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांपैकी एक सत्संग यशस्वीरित्या चालू झाला. सत्संग चालू होण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रसार केला आणि अनेक जिज्ञासूंशी संपर्क साधला.
७. जिज्ञासू जोडले जाणे
सोनलताईंच्या सत्संगाची जिज्ञासू आतुरतेने वाट पहात असतात. त्यांच्यापैकी काही जिज्ञासू थोडीफार सेवाही करू लागले आहेत. एक पुष्कळ जुने साधक पुन्हा संस्थेच्या कार्याशी जोडले जाऊन त्यांनी सोनलताईंसमवेत सत्संगाची सेवा तळमळीने करण्यास आरंभ केला.
८. सोनलताईंची गुरुसेवेप्रती तळमळ पाहून श्री गुरुकृपेने मीसुद्धा दायित्व घेऊन सत्संगात विषय मांडण्याची सेवा करू लागलो.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आणि सद्गुरु काकांच्या आशीर्वादाने मला सोनलताईंकडून एवढी सूत्रे शिकायला मिळाली, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. वेदांत अरुण सोनार (वय २० वर्षे), जळगाव. (२६.२.२०२४)