शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत साधिकेला झालेले त्रास अन् तिने अनुभवलेली गुरुकृपा !
‘सामायिक पित्तनलिकेतील पित्ताचे खडे काढणे आणि पित्ताशय काढून टाकणे’ ही शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना झालेले त्रास अन् त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे पाहूया.
(भाग १)
१. सोनोग्राफीच्या अहवालात ‘पित्ताशयात पित्ताचे २ खडे आहेत’, असे आढळणे
‘मार्च २०२४ मध्ये एकदा मला पोटात कळा येऊ लागल्या. आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया यांनी माझी तपासणी केल्यावर ‘पित्ताशयात खडे होणे किंवा स्वादुपिंडाला सूज येणे’, असे माझ्या त्रासाचे निदान केले. त्यांनी मला ‘सोनोग्राफी’ (टीप १) करून घेण्यास सांगितले. त्यानुसार मी मडगाव येथील डॉ. मनोज सोलंकी यांच्याकडे ‘सोनोग्राफी’ करून घेतली. ‘सोनोग्राफी’च्या अहवालात ‘माझ्या पित्ताशयाच्या (गॉल ब्लॅॅडरच्या) नलिकेच्या गळ्याजवळ एक मोठा खडा आहे आणि सामायिक पित्तनलिकेच्या (कॉमन बाईल डक्टच्या) खालच्या भागात, म्हणजे सामायिक पित्तनलिकेच्या लहान आतड्याच्या ‘सी’ आकाराच्या आरंभीच्या भागात शिरून पित्त हा पाचकरस लहान आतड्यात सोडते, तेथे पित्ताचे २ खडे असल्याचे आढळले. हे खडे काढून टाकण्यासाठी त्यांनी मला ‘३ शस्त्रकर्मे करून घ्यावी लागतील’, असे सांगितले.
(टीप १ -‘सोनोग्राफी : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची केलेली चाचणी)
२. पित्ताशयातील पित्ताचे खडे काढण्याच्या संदर्भात करायला सांगितलेली शस्त्रकर्मे
२ अ. ‘एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलेंजियोपॅन्क्रिएटोग्राफी’ (ईआरसीपी) (टीप २) हे पहिले शस्त्रकर्म : दुर्बिणीच्या साहाय्याने सामायिक पित्तनलिकेच्या खालच्या भागातील दोन खडे काढून टाकणे आणि ‘स्टेंट’ (टीप ३) बसवणे.
(टीप २ – एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलेंजियोपॅन्क्रिएटोग्राफी (ईआरसीपी) : ही पित्ताशय, पित्तनलिका आणि स्वादुपिंड यांच्याशी संबंधित समस्यांचे निदान अन् त्यावरील उपाय करण्याची प्रक्रिया आहे. यात मुखावाटे विशेष प्रकारची दुर्बिण अन्ननलिका, जठर आदी मार्गाने पित्तनलिकेत घातली जाते.)
(टीप ३ – स्टेंट : ‘पित्तनलिकेतील पोकळी विना अडथळा रहावी’, यासाठी त्यात बसवण्यात येणारी अन्य कृत्रिम पदार्थापासून बनवलेली नलिका.)
२ आ. ‘लॅप्रोस्कोपी’ (टीप ४): नंतर पोटावर ३ ठिकाणी छेद घेऊन दुर्बिणीच्या साहाय्याने पित्ताशय काढून टाकणे.
(टीप ४ -‘लॅप्रोस्कोपी’ : हे दुर्बिणीच्या साहाय्याने उदरपोकळीमध्ये केले जाणारे किमान कापणे-जोडणे अशा पद्धतीचे शस्त्रकर्म आहे.)
२ इ. ‘एंडोस्कोपी’ : मुखावाटे पित्तनलिकेत घातलेल्या विशेष दुर्बिणीच्या साहाय्याने सामायिक पित्तनलिकेमध्ये बसवलेला ‘स्टेंट’ काढून टाकणे.
३. ‘ईआरसीपी’ हे शस्त्रकर्म करून पित्ताशयात झालेले खडे काढून टाकणे, नंतर तेथे ‘स्टेंट’ बसवणे आणि या ‘स्टेंट’मुळे साधिकेला पोटात सतत टोचल्यासारख्या वेदना ३ मास होणे
मी प्रथम मडगाव येथील व्हिक्टर रुग्णालयातील ‘एंडोस्कोपी’ तज्ञ डॉ. अल्वारिस यांना भेटले. त्यांनी माझी तपासणी करून १२.४.२०२४ या दिवशी मला संपूर्ण भूल देऊन सामायिक पित्त नलिकेच्या ‘सी’ आकाराच्या खालच्या भागातील दोन खडे ‘ईआरसीपी’ हे शस्त्रकर्म करून काढून टाकले आणि तेथे एक ‘प्लास्टिक’चा ‘स्टेंट’ बसवला. त्यांनी सांगितले, ‘‘३ मासांनी ‘स्टेंट’ काढून टाकूया.’’ या ‘स्टेंट’मुळे मला पोटात सतत टोचत होते. मला उजव्या कुशीवर झोपल्यावर अधिक प्रमाणात टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. मला उताणे झोपावे लागत होते. मी पोटाला हात लावून बोटाने थोडेसे दाबले, तरीही मला टोचत होते. अशा स्थितीत मी ३ मास काढले.’
(क्रमशः)
– गुरुचरणी शरणागत,
आधुिनक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833675.html