शस्त्रकर्मगृहात रुग्ण बासरी वाजवत असतांना त्याच्या मेंदूची जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी रुग्णालयात यशस्वी ! – मेंदूविकारतज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के
कोल्हापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – ‘ट्यूमर’ झालेल्या एका रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया सिद्धगिरी रुग्णालयातील शस्त्रकर्मगृहात तो रुग्ण बासरी वाजवत असतांना यशस्वी करण्यात आली. (बाधित भागाला भूल दिली होती.) अशा प्रकारच्या अत्यंत अवघड आणि अत्यंत गुंतागुंतीच्या १०२ शस्त्रक्रिया सिद्धगिरी रुग्णालयात यशस्वी करण्यात आल्या आहेत. भारतातील फार थोड्या रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, अशी माहिती सिद्धगिरी रुग्णालयाचे मेंदूविकारतज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर आणि श्री. विवेक सिद्ध उपस्थित होते.
या वेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘बाहेर कुठेही अशा शस्त्रक्रिया केल्यास त्यांचे व्यय ८ ते १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक येतो. सिद्धगिरी रुग्णालयात आम्ही ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर ही शस्त्रक्रिया केवळ दीड ते २ लाख रुपयांमध्ये करतो. ‘निराधारांना आधार’ या तत्त्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणार्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील ‘एन्.ए.बी.एच्.’ मानांकीत धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी रुग्णालय’ अशी ओळख निर्माण केली आहे. तरी गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा.’’