श्री गणेशाची भक्ती करा !
७ सप्टेंबर या दिवशी श्री गणरायाचे आगमन होणार आहे. त्याच्या आगमनाची पूर्वसिद्धता सर्वजणच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करतात. प्रतीवर्षीच श्री गणरायाचे आगमन होते, तरीही त्याच्या स्वागताची सिद्धता उत्साहात आणि भावपूर्णरित्या केली जाते. गणेशोत्सव मंडळे असोत किंवा घरगुती श्री गणेशमूर्ती असोत, सर्वच जण वेगळाच आनंद अनुभवत असतात. ‘प्रत्यक्षात श्री गणेशच आपल्या घरी येत आहे’, असा भाव असतो. श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पृथ्वीवर गणेशतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या गणेशतत्त्वाचा आपणाला अधिकाधिक लाभ होण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवेत ?, याकडे लक्ष दिल्यास श्री गणेशाच्या आगमनाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. अर्थातच श्री गणेशाप्रती भाव वाढवणे आणि त्याची मनोभावे भक्ती करणे, हेच आवश्यक आहे. श्री गणेशाची भक्ती करण्यासाठी त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यास त्याच्या प्रती भाव निर्माण होणे आणि त्याची भक्ती करणे सोपे जाणार आहे.
श्री गणेश विघ्नहर्ता आणि शुभंकर आहे. कोणतेही शुभकार्य करायचे, तर आपण श्री गणेशाला आवाहन करतो; कारण श्री गणेश सर्व विघ्ने दूर करतो. श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्ती आकर्षून घेणारा, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. ‘मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले’, याची जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. उपासकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. मनुष्याच्या शरिरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या मूलभूत शक्तीलाच ‘प्राणशक्ती’ म्हणतात. श्री गणेश ही प्राणशक्ती वाढवणारी देवता आहे. त्यामुळे श्री गणपतीचा नामजप केल्यास प्राणशक्ती वाढते. गणेश प्रसन्न झाला की, आपल्याला वाक्सिद्धी प्राप्त होते. ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये श्री गणेशाची आहेत. गणेशोत्सवात श्री गणेशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते, म्हणजेच त्याची ही वैशिष्ट्येच तत्त्वरूपात कार्यरत असतात. आपण श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि भक्ती केल्यास हे तत्त्व आपल्याला ग्रहण होते.
सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहिल्यास हे तत्त्व ग्रहण करण्यासाठी प्रयत्न न होता बहिर्मुख होणे, मौजमजा करणे यांकडेच अधिक कल दिसतो. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच गणेशभक्त गणेशाच्या आगमनाचा उद्देश समजून घेऊन त्याची पूजा करतांना दिसतात. आता आपण सर्वजण श्री गणेशचतुर्थीपासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत गणेशाची भक्ती अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न करूया !
– वैद्या (सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.