Statue of Chhatrapati Shivaji Maharaj collapsed : शिल्पकार जयदीप आपटे यांना कल्याण येथे अटक !
|
कल्याण – मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक केली आहे. त्यांना कल्याण येथे त्यांच्या घराच्या ठिकाणाहून कह्यात घेण्यात आले. या आधी या प्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवला होता. पोलिसांनी पाटील यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यासाठी मालवण पोलीस, कल्याण, ठाणे ग्रामीण पोलिसांची एकूण ५ पथके कल्याण, भिवंडी, शहापूर परिसरात त्याचा शोध घेत होती. जयदीप आपटे तोंडावर मास्क लावून कल्याणमधील त्यांच्या घरी पोचले. त्या वेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटे यांना कह्यात घेतले. त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.
शिल्पकार आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. पाटील यांना पोलीस कोठडी
जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मालवण येथील न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ५ सप्टेंबर या दिवशी मालवण पोलिसांनी आपटे यांना मालवण येथे आणले. या घटनेतील एक संशयित आरोपी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील हे पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी ५ सप्टेंबरला संपला. त्यामुळे आपटे आणि डॉ. पाटील या दोघांनाही पोलिसांनी ५ सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित केले.
जयदीप आपटेवर कठोर कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुणाचीही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे समान आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात ज्यांनी राजकारण केले, तो प्रकार दुर्दैवी आहे. संजय राऊत यांना ठाण्यातील एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.