Kolkata Doctor Case : प्रकरण दडपण्यासाठी पोलीस अधिकार्‍याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला ! – मृत महिला डॉक्टरच्या पालकांचा पोलिसांवर आरोप

कोलकाता येथील मृत महिला डॉक्टरच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

कोलकाता (बंगाल) – कोलकाता येथील राधा गोबिंद कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी या डॉक्टरच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पालकांनी म्हटले की, आमच्या मुलीचा मृतदेह जेव्हा आमच्याकडे सोपवण्यात आला, तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने प्रकरण दडपण्यासाठी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्ही नकार दिला. पोलिसांनी कसून चौकशी न करता प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न केला.

मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले की,

१. घटनेच्या रात्री त्यांच्या मुलीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यास भाग पाडले. कोणतीही चौकशी न करता त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

२. त्यानंतर आम्ही १२ वाजून १० मिनिटांनी रुग्णालयात पोचलो, तेव्हा मुलीचा चेहरा पहाण्यासाठी आम्हाला ३ घंटे ‘सेमिनार हॉल’च्या बाहेर बसवून ठेवण्यात आले. आम्हाला मृतदेह पहाण्याची अनुमती नव्हती. एवढेच नाही, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत पोलीस ठाण्यात थांबावे लागले.

३. त्या दिवशी रुग्णालय प्रशासनाकडून कुणीही आमच्याशी बोलले नाही. आम्हाला अंतिम संस्कार करायचे नव्हते; पण आमच्यावर दबाव आणण्यात आला. आम्ही तासभर पोलीस ठाण्यात बसून राहिलो. नंतर जेव्हा मृतदेह आमच्या कह्यात देण्यात आला, तेव्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने आम्हाला प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केला.

४. नंतर आम्हाला बलपूर्वक घरी पाठवण्यात आले. घरी जाऊन पाहिले, तर ४०० पोलीस उभे होते. मग आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता, आम्हाला मृतदेहावर अतंत्यसंस्कार करावे लागले; मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराचा खर्च कुणी केला ?, हे आम्हाला आजपर्यंत कळू शकले नाही.

संपादकीय भूमिका

सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !