Vladimir Putin : युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे युक्रेनसमवेतचे युद्ध थांबवण्याविषयी सुतोवाच !

मॉस्को (रशिया)  – युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांनी केले.  भारताखेरीज चीन आणि ब्राझिल यांचेही पुतिन यांनी नाव घेतले.

१. पुतिन पुढे म्हणाले की, युद्धाच्या प्रारंभीच्या आठवड्यात इस्तंबूल (तुर्कीये) येथे झालेल्या चर्चेत रशिया आणि युक्रेन यांच्यातील अधिकार्‍यांमध्ये प्राथमिक करार झाला होता; परंतु त्याची कार्यवाही (अंमलबजावणी) झाली नाही. जर पुन्हा शांतता चर्चा झाली, तर हा करार चर्चेचा आधार म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो.

२. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी गेल्या काही महिन्यांत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा दौरा केला आहे. भारत आणि रशिया यांचे संबंध फार जुने आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशीही मोदी यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे सांगितले जाते. रशिया आणि युक्रेन यांच्या भेटीमध्ये शांतता उपक्रमात भारत भूमिका बजावण्यास सिद्ध असल्याचेही भारताने सांगितले होते.